चौकातून सायकल वळवत तिने
समोर दिसणारा क्लास गाठला. तिच्या लहान उंचीला ताईची सायकल जड होत होती. सिटवर न
बसता, उभ्यानेच पायडल मारत ती क्लासपर्यंत पोहोचली. कसाबसा स्टॅन्ड लावला,
स्कर्टच्या खिशात किल्ली टाकत ती वाडयात शिरली.
छोटया जुन्या वाडयात, पुढे आलेल्या
एका खोलीत तिचा तबल्याचा क्लास असायचा. मध्यभागी खाली वर फरश्या झालेला छोटा चौक,
डाव्या बाजूला क्लासची खोली, त्याच्या काटकोनात असणाऱ्या दारामागे एक दोन
खोल्यांचं घर. उजव्या बाजूला दोन दारं. एका दाराला जळमटांनी झाकून टाकलेलं, गंजलेलं
कुलूप. दुसऱ्या दारासमोर डालडाच्या डब्यात लावलेली तुळस वाऱ्याने हलायची, तेवढीच
काय ती जिवंतपणाची खुण.
तबल्याचा क्लास मात्र सकाळी
दोन तास आणि संध्याकाळचे तीन तास त्या भागातली सगळी शांतता गिळून टाकायचा. गुरुपौर्णिमा
एका आठवडयावर आली होती. क्लासचे सगळे शिकाऊ तबलजी कार्यक्रमाच्या तयारीला लागले
होते.
सरांनी लहरा धरायला पेटी
पुढे ओढली तसं सर्वांनी आपापली जागा पकडत बसून घेतलं. ती आत आली, जागा नाहीशी
पाहून तिने दारातच मांडी घातली. एक एक विदयार्थी येऊन, सरांनी ठरवून दिलेलं वाजवून
जात होता. तिची नजर समोरच्या सरावावर तर पाठीचे डोळे मागची हालचाल टिपत होते.
शेजारच्या घराचा पडदा आज
जरा बाजूला सरला होता. आतलं स्पष्ट अस्पष्टस दिसतं होतं. ती पुन्हा पुन्हा तिकडे
वळून पहात होती. सगळ्या वाडयात, क्लास सोडून फक्त याच घराला जाग होती. आत नेहमी गडबड
गोंधळ चालत असणार असं बाहेरूनच त्या घराच्या भिंती पाहून वाटायचं.
बहुदा जोडपं असावं. त्यांची
सततची ये जा त्या जागेला वेग देत होती. आवाज अगदीच अस्पष्ट होता. ते काही बोलत
असतीलच तर काही कळत नव्हतं. तबल्याचा आवाज आजुबाजूच सगळं मिटवून टाकत होता. सराव
झालेली मुलं खोलीबाहेर पडताना त्यांचे पाय तिच्या नजरेआड येत होते. आणि ती पुढे
मागे होतं नजरेने त्या दोघांच्या हालचाली न्याहाळत होती.
सरांनी तिला हाक मारली. मान
सरांकडे वळवत तिने विचारलं, “ काय सर?”
“ लक्ष कुठे आहे तुझं ? चल
येऊन बस समोर.”
क्लासमधे शेवटची दोन चार
मुलं राहिलेली दिसली. ‘आपलं इतका वेळ लक्ष नव्हतं ’ विचार करत करत ती समोर येऊन
बसली. तिच्या उंचीशी, तबल्याची जोडीही शर्यत लावायची. मात्र तिच्या हातांच वजन
कुठेही कमी पडत नसे. सरांनी लहरा सुरु केला आणि समेवर येत तिची बोटं वाजू लागली. कुठे
शोधूनही चूक नाही कि उसंत नाही. एक एक बोल टपोरा होऊन येत होता. ऐकणाऱ्याच्या कानांना
तिचा इतरांपेक्षा असणारा वेगळा तबला कळायचा, जाणवायचा.
सलग वीस मिनिटं वाजवून ती
थांबली. दारात शेजारच्या घरातलं ते जोडपं येऊन उभं राहिलं. ‘ आपण त्यांच्या घरात पहात
होतो हे कळालं कि काय यांना ’ तिला मनातून
वाटून गेलं. सगळ्यांमधून काही क्षणांची शांतता पिंगा घालून गेली. तिथल्या
सगळ्यांच्याच नजरा त्या दोघांवर आणि त्या दोघांच्या मात्र तबल्यावरच्या निमुळत्या
लांब बोटांवर स्थिर झाल्या होत्या.
दोघांचे डोळे तुडुंब
झालेले. झराझरा वाहून जाईल सगळं असं वाटत होतं. त्याने खुणेनेच तिला छान झाल्याचं
सांगितलं. आणि तो तिला हे पुन्हा पुन्हा खुणेनं सांगू लागला. मधूनच तबल्याकडे बोट
दाखवत ते बोट तो तिच्याकडे वळवायचा आणि छान झालं असं खुणावत राहायचा. तोंडाने आ..
आ आवाजापलीकडे तो काहीही बोलत नव्हता. त्याच्यामागे उभ्या बायकोने टाळ्या वाजवायला
सुरुवात केली, तसं तो हि हातांची उघडझाप करू लागला.
तिला समोर घडत असलेलं, आत
झिरपेना. ‘ त्यांना नक्की काय म्हणायचंय ’ तिने सरांकडे पाहिलं.
“ तू छान वाजवलंस म्हणताहेत
ते...” सरांना तिचा प्रश्न कळला.
“ पण मग ते असं का सांगत
आहेत ?” तिचा पुढचा प्रश्न.
“ ते मुके बहिरे आहेत. दोघंही..”
“ काय ? ” तिने त्या
दोघांकडे पाहिलं. दोघं किती कौतुकाने तिच्याकडे पहात होती.
आता त्याने पुन्हा खाणाखुणा
सुरु केल्या. खुणांमधून तुझा तबला ऐकून अंगावर काटा आला हे तो न थांबता कितीतरी
वेळा सांगत राहिला.
“ ऐकला ? कसा ऐकला ?” ती
आता सावरली आणि तिनेही खुणेनेच त्या दोघांना विचारलं.
तो वळला. त्याने
पाठीमागच्या भिंतीवरून मायेने हात फिरवला. मग त्याने भिंतीला कान लावला आणि डोळे
मिटून घेतले. त्याच्या मिटलेल्या डोळ्यांतून एक टपोरा आवाज ओघळला आणि भिंतीत
मिसळला. कायमचा.
भूपाली निसळ.

