इसविसनपूर्व सातव्या
शतकाचा काळ. सर्गोनीद राजवंशाचा शेवटचा राजा असुरबनपालाने त्याचे असिरीयन
साम्राज्य जगातील सर्वात मोठे राज्य म्हणून राखलेले. त्याचं सार्वभौमत्व देहबोलीतून
दिसतं राहणारं. त्याच्या बलदंड शरीरावरच्या युद्धाच्या खुणा तो सिंहासारखा मिरवी.
असुरबनपाल, एक अत्यंत पराक्रमी योद्धा आणि साहित्याची जाण असलेला रसिक वाचक !
असुरबनपालाने राजसभेत
प्रवेश केला. सभा झुकली. त्याने मानेनेच वंदन स्वीकारलं आणि तो सिंहासनारूढ झाला.
“अधिपती, इष्टका आल्या?”
अधिपतींनी सामोरं येत
राजाला अभिवादन केलं, “श्रेष्ठ, गतदिनी काही ग्रंथ प्राप्त झाले. ते जमेत धरल्यास
प्रार्थना, काव्ये, धार्मिक ग्रंथ, पौराणिक कथा, ज्योतिष आणि गणित असे विषय मिळून
आपल्याकडे हजारात इष्टका जमल्या आहेत.”
राजाच्या चेहऱ्यावर समाधान
विलसले, “तुम्ही ‘लिहिलेल्या इष्टकांचे अधिपती’, त्यांचे रक्षक ! अधिकाधिक
विषयांवरचे इष्टकाग्रंथ आपल्या ग्रंथालयात जमा व्हावयास हवे. जनतेसाठी ते वाचनास
उपलब्ध असावेत याची काळजी असू द्या.”
उत्तमोत्तम ग्रंथांनी
राजाचे ‘इष्टकागृह’ सजू लागले. वालुकाकणांनी प्रत्येक ग्रंथाकरिता कपाटिका घडू
लागल्या. विषयानुसार सूची झाल्या. ग्रंथ विभागाने रचले जाऊ लागले.
लौकरच त्यात इसविसनपूर्व
सतराशे वर्षापूर्वीच्या शुक्र ताऱ्याच्या वेधाची शादा (वीट) मानाने विराजमान झाली.
एके सायंकाळी इष्टका घेऊन
राजा शुक्राच्या दर्शनास इन्द्रकोशात उभा होता. उजळता शुक्र पश्चिमेच्या
क्षितिजावर लकाकू लागला. समोर नजरेस पडत होते ‘ग्रंथालय’, मुकुटात चांदणं गुंफल्यागत
!
“नरेंद्र...” सेवक आला.
राजाने आकाशावरची नजर न हटवता हातानेच पुढे बोलण्याची आज्ञा केली.
“नरेंद्र, हम्मुराबी आपले
दर्शन घेऊ इच्छितात.”
“नरेश हम्मुराबी ? त्यांना
मानाने येथे घेऊन या.”
हम्मुराबीच्या हातात इष्टका
पाहून, असुरबनपालाचे कुतूहल जागे झाले. हम्मुराबीने लिहिलेले कायदे, जगातील पहिली
कायद्याची लिखित संहिता आता असिरीयन साम्राज्याच्या ग्रंथालयाचा भाग झाली होती.
काळ लोटला. पडझडी झाल्या. सामाज्य्रे जमीनदोस्त झाली. धुळीच्या
लोटांनी ‘लिहिलेल्या विटांचं घर’ पोटात घेतलं. शेकडो वर्षांनी हे लोट जेव्हा बाजूला
सरले तेव्हा दिसल्या हजारो विटा... त्यावरची लिपी छातीशी घट्ट जपलेल्या !
भूपाली निसळ.
