निर्माणाकडे जाणा-या रस्त्यावर
काहूर असतं, ‘रिकामं’पण असते, एक अनामिक ओढ असते.
‘ती ओढ कसली आहे’ नाही समजत. त्यात अस्थिरता असते आणि स्थैर्यही.
आज म्युझियमच्या गेटपाशी
उभं राहून आतल्या वास्तूवर नजर टाकली तेव्हा आनंद आणि निर्मितीमागच्या उसळत्या
लाटा दोन्ही जाणवत होतं. त्या रस्त्याने आपण दोघं जाताना झालेल्या गप्पा आठवत
होत्या. तुझी दुसरी, तिसरी .... पाचवी .. दहावी माहित नाही कितवी चक्कर होती इथे.
मी मात्र नवखी!
त्या दिवशी आपण म्युझियम
तुझ्या नजरेने पाहणार होतो बाबा. तुझ्या शब्दांत ऐकणार होतो. तू मला आवडलेली
चित्रं, शिल्पं दाखवणार होतास. त्यांच्याविषयी भरभरून बोलायचं होतं तुला. तुझी आत
जाण्यासाठीची घाई कळत होती. ‘इतक्या वेळा पाहूनही हा इतका उत्सुक कसा?’ मला आतून
वाटत होतं.
कधी असं होतं ना .. रस्ता
संपता संपत नाही. तुझं ‘असं’ होताना पाहिलंय मी इथे येताना, औंधच्या रस्त्यावर.
यमाईच्या डोंगराकडे
जाणाऱ्या रस्त्याशी एक वाट फारकत घेते. तिला लांब लांब जाताना पाहून एका ठिकाणी थांबायचास
तू हमखास. त्या दिवशीही थांबलास. गाडीतून उतरून माझ्या खिडकीशी आलास.
‘उतर खाली’ दार उघडत
म्हणालास.
समोर त्रिकोणातून दुसरा
रस्ता दूर जाताना दिसत होता. नजरेपुढच्या त्याच्या टप्प्यात दोन्ही बाजूंनी हिरवी
दाट झाडं आणि त्यांची काळी शांत सावली!
‘आपण उभे आहोत हा मार्ग,
एका अश्या वास्तूशी जातो जिथे सर्जनाचा उत्सव मांडला आहे. ही समोरची वाट कलेपासून
लांब लांब जाणारी वाटते मला, कमनशिबी वाटते. मागे एकदा असाच, इथेच उभा राहून पाहत होतो
तिच्याकडे. ही झाडं तेव्हाचं लक्षात आली माझ्या. मग वाटलं, या वाटेचं असं तिथून जाणं
म्हणजे तिचं प्राक्तन आणि ती झाडं म्हणजे तिच्या वेदनेवर निसर्गाची फुंकर असावी
बहुदा...’ तू बोलत राहिलास.
आजही झाडं तशीच उभी आहेत. भर
दुपारच्या उन्हाच्या काहिलीत तेवढाच रस्ता शांत भासतोय. त्या टप्प्याने दिलेली
अथांग शांतता मला या म्युझियमच्या रस्त्याशी विणता येते आहे. तिथल्या झाडांचं सळसळून
एकमेकाला बिलगणं म्हणजे निर्मितीची आश्वासनं असावीत, नाही का?
त्यादिवशी, गेटच्या आत पाऊल
टाकताना विचारलंस, “चहा घेऊन सुरुवात करूया?”
“तुझ्याच्याने इतकं थांबवेल?”
मी आश्चर्यचकित.
“चल, घेऊया..” हसत खांदयावर
हात टाकलास. तुझं हे असं ‘मित्र’ होऊन जगणं प्रचंड आवडायचं मला.
तुला मुलगी–बाप
नात्यापलीकडे जाता आलं, तुझ्यासोबत मला नेता आलं कारण तू मनस्वी होऊन जगलास.
प्रत्येक माणसावर तू भरभरून प्रेम केलंस. ‘एखाद्या नात्यावर त्या नात्याचं लेबल
लावलं की भावना, कृती, व्यक्तता सगळ्यावरच बंधनं येतात,’ तू म्हणायचास.
‘हे म्युझियम म्हणजे
बाळासाहेब पंतप्रतिनिधींच कलेक्शन! काय वेडा माणुस होता तो! एकसे एक शिल्प, चित्र,
संग्रह आहेत या वास्तूत! हे सगळं एक माणुस गोळा करत राहतो. एवढ्या छोटया गावात,
डोंगर उतारावर दगडातून रेखीव इमारत उभी करतो आणि मग ही शेकडो कलेची प्रतिकं इथे
मानाने रचली जातात. त्यांच्यातून कविता प्रसवावी असा भास होत राहतो.’ घोट घोट चहा
पिताना तुझं माहिती सांगणं चालू असतं.
रिकामा ग्लास खाली ठेवत, तू
खिशातून सिगारेटचं पाकीट काढतोस. ती शिलगावताना प्रकाश पसरतो चेहऱ्यावर तुझ्या.
तुझे झुरके निवांत असतात आणि तरीही डोळ्यात आतली दालनं पाहण्याची घाई गर्दी करत
असते.
आतमध्ये वेगळा थंडावा असतो.
बाहेर - आतच्या या एका पावलात इतका फरक कसा असतो? की आपल्याला जाणवत असते ती आतली संयत
स्थिर शांतावणारी मखमल?
आपण फिरत राहिलो या
दालनातून त्या दालनात. थोरामोठया कलाकारांच्या कलाकृती! त्या एखादया सामान्याने
समजून न घेता पाहिल्या तरी छाती दडपून जाईल त्याची. इथे ‘तू’ सोबत होतास. तुझा
शब्द न् शब्द म्हणजे मातीपासून आकारापर्यंतचा अखंड प्रवास! तू बोलत राहिलास आणि
हरेक चित्र, हरेक शिल्प जिवंत झालं समोर.
एकुणात आठ हजारांवरच्या
निर्मिती, इतिहास सांगणाऱ्या वस्तू, सोळा हजार नवी जुनी पुस्तकं.. साडेतीन – चार
हजारांवर हस्तलिखितं! तू म्हणायचास ते बरोबरच आहे, ‘एखादा माणुस एकटा, इतकं सगळं,
एकाच आयुष्यात कसं जमवू शकतो? एकत्रित इतकं सुंदर कसं मांडू शकतो?’
मी हेनरी मोअरच्या ‘मदर अँड
चाईल्ड’ समोर उभी राहिले. खूप उंचीच्या त्या चौकातून तुझा खर्जातला आवाज फिरून येत
होता. तुझं बोलणं मोअरचं शिल्प ‘बोलकं’ करत होतं. ‘हेनरी मोअर म्हणजे semi-abstract शिल्पांचा राजा!’ त्याची कामाची पद्धत तू अशी काही समजावून सांगितलेलीस की ते
शिल्प कसं घडत गेलं असेल ते आपसूक येत गेलं डोळ्यांत.
मला तुझी आपल्या जुन्या
घरातली खोली आठवते. खोलीचा दरवाजा आठवतो आणि आठवतेय त्यावरची ‘ओलेती’.
हे चित्र तू पहिल्यांदा इथे
आलेलास तेव्हाच मनात भरलेलं तुझ्या. त्या चित्रावरची ओली पाठमोरी स्त्री ‘सौंदर्याचा
अभिजात दाखला’ आहे! या चित्राला त्याची स्वतःची अशी भाषा आहे. त्या स्त्रीची ओली
पाठ आणि त्वचेला चिकटलेली वस्त्र म्हणजे केवळ नजाकत!
ठाकूरसिंगचं हे चित्र
कुठल्याश्या मासिकाच्या मुखपृष्ठावर आलं आणि वाद उभे राहिले. ओलेतीला अश्लीलतेचं वळण दिलं गेलं.
तू ज्या रीतीने ‘ओलेती’
समजावलेलंस, तेव्हा तर कुठे दिसली नव्हती नग्नता. मला वाटतं नग्नता मनात असते
बघणाऱ्याच्या. अशा माणसांनी चित्रं पाहिली की कॅनव्हास परिवर्तीत होतो आरश्यात आणि
त्यांच्या डोळ्यातले गढूळ रंग उतरत असावेत त्यावर.
तू काहीही म्हण बाबा, पण या
चित्रासमोरून हलणं खरंच कठीण होऊन जातं. खिळून राहणं काय असतं हे इथे कळतं, एकूणच,
या जागेत कळतं.
म्युझियमची दगडी वास्तू आणि
मागच्या बाजूची उंच झाडं म्हणजे माहौल असतो. झाडाखालच्या बाकावर बसलं की इथला
वाराही शांत, संयत जाणवतो. झाडावरची अखंड चिवचिव आपल्याला शांतावत जाते.
या झाडांच्या सावलीत ओळीने
उभ्या खांबांवर असलेल्या मूर्ती म्हणजे काळाचा परीघ. आख्खं म्युझियम पाहिल्यानंतर
थांबून जायला होतं. सुचतच नसतं काही. इथली सहा शिल्पं आपल्याला आरंभाशी नेऊन
सोडतात. सहा ऋतूंचे सहा सोहळे अनुभवणं म्हणजे उर्जा असते.
वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद,
हेमंत आणि शिशिर... काय एक एक शिल्प! प्रत्येक ऋतूची लय मूर्तीत उतरलेली. हरेक
शिल्प त्या त्या ऋतूचं यौवन पांघरून उभं!
म्युझियमला येण्याचा रस्ता
जितका अवघड आहे ना, तेवढाच परतण्याचा आहे रे. तू कसा परतायचास?मला वाटतं ते तुला माझ्यापेक्षा
अधिक सोपं असावं. कारण तुझ्या सोबतीला असतील इथल्या कलाकृती, त्यांचा इतिहास,
त्यांचे आकार, त्यांचे डोळे... कदाचित त्यांचे श्वाससुद्धा.
पण माझ्यासोबत असतात ती
शिल्पं - चित्र, त्यांच्या अवतीभवतीचे अजूनही हवेत तरंगते तुझे शब्द, अर्थ, तुझा
उत्साह आणि तुझी अस्वस्थता... मला हे सगळंच घेऊन परतायचं असतं. परत आल्यावर
रोजच्या जगण्यात तुला मिसळूही द्यायच नसतं. तेव्हा मात्र मी आठवते सोबत आणलेला तू
- म्युझियमच्या गेटवर सिगारेट ओढून निवांत
झुरके सोडणारा...
आज तर तू नाहीसच. परतलेय
पुन्हा औंधवरून. गेटपासून वास्तूपर्यंतचा रस्ता डोळ्यातून खाली ठेवता येत नाहीये
आणि तिथे तरंगणारे तुझे शब्द, अर्थ, तुझा उत्साह आणि तुझी अस्वस्थता सोडत नाहीये
माझं शरीर......
भूपाली निसळ
#aundh #shribhavani #musium #ravivarma #yamai #oleti
x
