Tuesday, 9 August 2011

एक चौकट अशीही ---



कशातही, कोणातही गुंतायच नव्हत.
नव्हतंच अडकायचं तिच्यात कोणत्याही संदर्भांनी !
कोणतीच घुटमळ नको होती त्याला तिच्या पैंजणापासली ...
तरीही तिची सोबत हवीशी होऊन गेली त्याला बंधनांशिवायची.
बाईपणात पिचलेली आई आठवत राहिली की ...
तिच्याच समोर कितीदातरी संतापानं येरझाऱ्या घालायचा .
कोणत समाधान असतं, तुम्हा बायकांना बंधनाचही अनेकदा विचारत रहायचा.
कुशीत शिरायचा तिच्या , तेव्हा तिला वाटायचं, आपल्यात हा आई तर शोधत नसावा ना ?
थकून झोपलेल्या त्याच्या पाठमोऱ्या शरीराकड पहायची तेव्हा दिसत रहायचं तिला तिच जग त्याच्या पाठीवर साचलेल.
खरतर तिलाही नकोच होत कुठलही बंधन...
तो भेटला आणि ती अडकत गेली त्याच्यामध्ये, तिच्याही नकळत.
तिला तिचे असे संदर्भ हवे होते...
तिची स्वतंत्र जागा हवी होती.
आणि तो मात्र ठाम. कोणतीही चौकट त्याच्यासाठी बनलेली नसल्यागत.
कशातच गुंतायच नव्हत त्याला . स्वत:चं घर नको, गाडी नको ... अगदी माणूस ही नको
एकदा मेलो की काय राहत मागे ?’ त्याचा नेहमीचा प्रश्न...तिला निरुत्तर करायचा.
मृत्यूच्या एका क्षणासाठी, आयुष्यभर जपलेल हे परकेपण आणि पोरकेपण तिला अगदीच टोकाच वाटायचं.
परवा ....
तो गेला ....
ती
तिच्या सोबतचे दिवस  
काही पत्र
तिला लपेटून राहिलेला त्याच्या शरीराचा वास
त्याने थोडीफार जमवलेली भांडीकुंडी , त्याचे कपडे
त्याची आई ...
तसच मागे ठेऊन.
     




Tuesday, 2 August 2011

" जालियनवाला बागेची गोष्ट "


परिकथेतल्या गोष्टींबरोबर
सांगायचास,
तू ,
इतिहासातल्या कितीतरी गोष्टी,
बोस , भगतसिंग
नी जग जींकू पाहणारा सिकंदर सुद्धा !
आठवतेय आज ही,
तू सांगितलेली
" जालियनवाला बागेची गोष्ट ".
फैरी झडत राहिल्या
हजारो निष्पाप जीवांवर
आणि
वेदना तडफडत राहिली
चारी बाजूनी उंचच उंच भिंती असणाऱ्या
बंदिस्त काळगुहेत...
आज उमगतय ,
वेदनेची जात बदलत नसते कधीच.
तुझं जाणं
तुझं नसणं
आठवण करून देत राहत
त्या रक्तरंजीत विहिरींची.
भिंतींचे टाहो
भेदत राहतात माझी काळीजभूमी.
त्या जात्या श्वासांनी,
रुजल्या नात्यांनी
एक नवा इतिहास रचला...
प्रतिकारात्मकतेचा ,
स्फुल्लिंगाचा,
आज ,
तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट आठवताना
समोरची पायवाट स्पष्ट होत जाते ,
नी
मी मार्गस्थ होतो ,
एका नव्या इतिहासाच्या दिशेने !

Saturday, 23 July 2011

prawahi


प्रिय,
नदी पाहिलीएस कधी ?
किनारे कोणते होते तेव्हा ?
नदी – नदीच होती की होती तुझ्या विचारांचं प्रतिबिंब ?
कधी स्वच्छंद खळाळती, कधी गहन शांत ...
तिऱ्हाईत म्हणून पाहिलस् कधी पाण्याकडे ? – साऱ्या शहराची मनोवस्था पाण्यावर उमटलेली...तरंगणारी.
नदी व्हावं वाटत म्हणणारे किती महाभाग भेटले असतील...प्रत्येकाची भावना वेगळी पण नदी होण् जमेल त्यांना ?
वर वर खळाळत राहण आणि आतून शांत, संयत वाहत राहणारे तिचे अणु रेणू पेलता येतील ?
किनाऱ्याना किनाऱ्याशीच थोपवण जमल पाहिजे ना...
वाहत्या प्रवाहांच आकर्षण कुठून येत मनात ? आपण ‘वाहत’ व्हावं अस का वाटाव ?
शरीरभर वाहत्या संवेदना शरीर हलक करू पाहतात की अजून काही ?
इतक सोप आहे हे ?
आयुष्य थांबल्यासारख वाटण वेदनामयचं...वाहत्या उर्जा जिवंत ठेवत असाव्यात आपल्याला बहुधा ...
वाह्तेपण प्रवाहाच ...
प्रवाहाविरुद्ध पोहण अवघड आणि प्रवाह वाहते करण त्याहून अवघड ...
वाह्तेपण हवं सहज...सजग...ताकद समेटणार आणि पारदर्शी .................... कायमचं !