हाय वे वरून त्याने गाडी आतल्या रस्त्याला घेतली. मधली दोन
तीन छोटी गावं मागे पडली तशी आता दुतर्फा लाल माती दिसायला लागली. झाडपानांचा रंग
जिवंत हिरवा व्हायला लागला. “ कोंकण ” …..
नजरेसमोर गाव दिसायला
लागलं. उतरत्या कौलांची झिरमिळ, हिरव्या रंगातून लकाकत होती. आजोळची माया समोर
दिसणाऱ्या गावावर, त्याच्या डोळ्यातून पसरत राहिली.
घरी पोहोचेपर्यंत अंधारून
आलं. फाटकातून गाडी आत घेताना, आजी तुळशीपाशी दिवा लावताना दिसली. “आलास का, ये ये ...” आजोबा
लगबगीने बाहेर आले. त्याची त्या दोघांबरोबरची संध्याकाळ पडवीतल्या कंदिलाच्या
प्रकाशात उजळून निघाली.
सकाळी चहाचा कप घेऊन आदित्य
परसदारच्या बागेत गेला. आजोबा नेहमीप्रमाणे सकाळी लौकरच बागकामाला लागले होते.
पानांवरून हात फिरवत, झाडांशी फुलांशी बोलत त्यांचं काम चालू होतं. आंबा, फणस अश्या
मोठया झाडांपासून कितीतरी फुलांनी बाग रंगीत केली होती. झाडांचे वाफे नीट करता
करता आदित्यशी त्यांच्या गप्पा चालू होत्या, “ आंब्याचा मोहोर बघ आदित्य. या वर्षी
भरपूर आंबे येतील या झाडाला.”
आजोबा आणि आजी दोघांनी
वयाची ऐंशी ओलांडली होती. दोघं एकमेकाशी घट्ट जोडले गेले होते. एकमेकाला जपत होते.
“ तू माझ्याआधी जाऊ नकोस बरं का !” आजोबा आजीला सांगायचे.
आजोबा गेले. आदित्य गावी
पोहोचला. बागेतल्या आंब्याचा मोहोर पुरता गळून गेला होता. झाड एकाकी वाटत होतं,
बाग एकाकी वाटत होती, आजीसारखीच.
“ एकटी कुठे राहतेस आजी, चल
माझ्या सोबत. वाटलं तर परत येऊ दोघं.” आदित्य म्हणाला. “ अरे मी आले तर बागेकडे
कोण बघणार ? तुला माहिती आहे ना आजोबांचा किती जीव होता बागेवर ?”
हो .. नाही करत आजी आदित्य
सोबत त्याच्या घरी आली.
आजोबांच्या आठवणी, त्यांचं
भरभरून जगणं एकमेकाला सांगत दोन तीन महिने उलटून गेले. “ गावी जाऊया का रे दोन चार दिवस ? घराची फार
आठवण येते आहे. ” आजीने आदित्यला विचारलं.
“ जाऊया ना. घर, बाग एकदा
बघून यायला हवी.” आदित्य म्हणाला.
बाग पुरती सुकली होती.
सगळीकडे गवत वाढलं होतं. आदित्यने घर आवरायला आजीला मदत केली आणि तो बागेकडे वळला.
गवत काढून, झाडांना पाणी घालून तो पडवीत येऊन बसला. अंधारू लागलं तसं आजी देवापुढे
दिवा लावून, कंदील घेऊन त्याच्या शेजारी येऊन बसली. “ थोडे दिवस इथेच थांबूया आजी.
मी रजा टाकतो.” तो म्हणाला. आजीने उत्तरादाखल का होईना पण हालचालही केली नाही.
रोजच्या निगुतीने बागेने
पुन्हा पहिलं रूपड घेतलं. टवटवीत हालचालीने घराला जिवंतपणा आला. एक आठवडा गेला असेल
नसेल, आजीने बिछाना धरला. “ माझं जे काही व्हायचं इथेच होऊ दे रे बाळा.” ती
आदित्यला सांगत राहायची.
आजीही गेली. आदित्यने नोकरी
सोडली आणि तो कायमचा गावाकडे परतला.
आदित्य गावाकडे राहतोय
त्याला आता काही महिने लोटले आहेत. झाडं बहरली आहेत. कळ्या उमलून आल्या आहेत.
फळांची छोटी छोटी रुपडी डोळ्यांना मोहवत आहेत.
आजोबा गेल्यावर एकही फुल फळ
नसलेली बाग. आज आजी गेल्यावर ... दोघंही गेल्यावर बहरली आहे. प्रत्येक फांदीवर दोन
फुलं.. दोन फळं अश्या सोहळ्याने.
भूपाली निसळ.
