Tuesday, 10 December 2019

काळी पडझड


     

         
           वेत्रवती आकाशाने देऊ केलेली जांभळी वस्त्र लेऊन वेल्हाळ वाहत होती. काठच्या झाडांनी गोळा केलेला अंधार नदीपात्राकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर सांडला. संध्येच्या प्रहराला पावसाळी झाकोळ तीक्ष्ण बनून पाण्याकडे सरकला. थेंबांच्या चाहुलीने, हिरव्या सळसळीच्या उंच टोकांवर मोरपंखी पिसा-यात लगबग झाली न् नदीमध्ये तरंग उठले.
पल्याडच्या काठाने लाल पत्थरांची वास्तू आकार घेत होती. दिवसागणिक तिचं थरथरतं प्रतिबिंब नदीतून मोठं होऊ लागलं.
राजाने आंदोळत्या बिंबावरून नजर फिरवली. उभ्या उंच गेलेल्या भिंतींनी त्याच्या स्वप्नांना ग्वाही दिली.
'आता कळस', राजा समाधानाने म्हणाला. 
त्याने सूचना दिल्या. शेकडो हात झटू लागले. लाल अखंड पाषाण, साच्यात कापला जात होता. मोठ मोठे तुकडे हत्तींनी वाहून नेले. मंदिराच्या दोन्ही दिशांनी, कितीतरी अंतरावरून शिळा रचायला सुरुवात झाली. जमिनीलगतचा एक थर पूर्ण झाला. त्यावर आता दुसरा थर ... कारागिरांनी चौकोनी दगड रचत आणले. भिंतींच्या वरच्या टोकापासून भूमीलगत, लांबपर्यंत उतार घडू लागला.   
एक, दोन... पाच.. दहा सारंग एका वेळेस शिखराच्या दिशेने चढत होते. चढाव फत्ते झाले. त्यांवरून आता कळसाचे अवयव वर न्यायचे, ते जोडायचे. एकमेवाव्दितीय भव्य देवालय, भव्य शिवलिंग राजा समाधानाने पाहत राहिला.
आयतनाच्या मागच्या बाजूने नदीमध्ये बांध पसरलेला. त्याने नदीचं पाणी अडवून प्रजेसाठी तलाव केला होता. तलावाचं नितळ, गोड पाणी दुभत्या जनावरांपासून माणसा – कणसांपर्यंत सगळ्यांची तहान भागवायचं.  
होशंगशहाचं शत्रुसैन्य रात्रीतून मंदिरापर्यंत पोहोचलं. गोल बंदिस्त पाण्याभोवती वेढा घातला गेला.
"फौजेवर हल्ला करायचा नाही." त्याने पुन्हा एकदा फर्मान सोडलं. हालचालींना वेग आला. चढावाचे पत्थर एक एक करून हटू लागले. मंदिराच्या छताचा जमिनीशी संपर्क तुटला.
मागच्या बाजूने बांधाला जागोजागी भगदाडं पडली. तलाव बेफाम होऊन घरादारांतून शिरू लागला.
राजा हरला... सैन्य हरलं, प्रजा हरली ... रक्ताचा एक थेंबही न सांडता होशंगशहाने लढाई जिंकली.
आजही या मंदिराला कळस नाही. मात्र आजूबाजूला दिसतं राहतात, शिखरासाठी बांधलेल्या चढावाच्या खुणा आणि कोरडया ठक्क तलावातली काळी पडझड.

भूपाली निसळ.

Friday, 31 May 2019

संयोगभूमी





मलायीची युद्धभूमी दुमदुमू लागली. तीनही बाजूंनी सागराच्या उसळत्या स्फटिकांनी कवेत घेतलेला हिरवाकंच बहरप्रदेश रक्तामासांच्या पाटांनी वाहू लागला. कलशपूला मलायीची भूमी कोणत्याही परिस्थितीत हवीच होती.
रामाधीपती, स्थिर विचारी राजा. त्याने मलायीला शांत, संयत पोसलं होतं. मलायी म्हणजे उसळत्या समुद्रातली संयोगभूमी. तुल्यबळ सैन्य पोसणाऱ्या रामाधीपतीला संहार मान्य नव्हताचं कधी. गौतमाच्या वाटेवरून जाताना त्याने माणूस जपला होता. मलायी म्हणजे तीन प्रमुख पंथांचा मिलाफ. सर्वार्थाने संयोगभूमी ! रामाधीपतीने उभारलेले जागोजागचे गौतमाचे पुतळे, शिवाची मंदिरे आणि विष्णूची शिल्पं मलायीचं सौंदर्य राखून होती.
बुधगुप्ताने आपली नाव किनाऱ्यावरून उसळत्या लाटांतून आत घेतली. दरिया पार करून पल्याडच्या बेटाकडे तो झपाझप वल्हू लागला. उसळतं पाणी नावेतून तोल खेचू लागलं, छातीत वेड भरलेला वारा त्याच्या नावेला उखडू पाहणारा. बुधगुप्ताने बेटं गाठलं. किनाऱ्याशी नाव बांधून त्याने वाळूतून आपले पाय रुतवले आणि तो चौफेर पाहू लागला. सारा दिवस बेटांतून चालत, त्याने रक्ताचा लाल रंग अन् माणसाची कातडी न कळलेल्या त्या प्रदेशाची खात्री करून घेतली आणि लगबगीने तो नावेकडे परतला.
उन्हं कलू लागली तसं अंधारल्या आकाशाने भणाणा वारा ओतायला सुरुवात केली. परतीला बुधगुप्ताचा कस लागत होता. समोर मलायीचा प्रदेश दिसू लागला. संध्याकाळच्या दाट काळ्या प्रकाशात, मलायीची हिरवी सळसळ सावळी होऊन हलत होती. काठावर दिसतं होती गौतमाची भूस्पर्श मुद्रेतली मूर्ती. पलित्यांच्या ज्वालांनी मूर्तीच्या रेषांना सोनेरी किनार देऊ केलेली. मोत्याच्या लाटा मूर्तीच्या हाताला स्पर्शून परत फिरत होत्या.
बुधगुप्त किनाऱ्याशी आला. अंधाराने संहाराला स्वल्पविराम दिला. बुधगुप्त मलायीत शिरला. रात्रीच्या अंधारात त्याने एक एक तेज:मुर्ती किनाऱ्याकडे हलवायला सुरुवात केली. गौतम, शिव, नारायणाच्या मूर्ती त्याच्या नावेतून आता हेलकावत प्रवासाला निघाल्या.
  नंतरच्या कित्येक रात्रीतून बलदंड हात सागरातून लाटा मागे करत, पाषाणतत्वांना नवीन भूमी बहाल करीत राहिले. कोणत्याही विकारांचा स्पर्शही न झालेली ती रुपेरी वाळू आता मलायीतल्या सौंदर्याने रसरसून उठली होती. अखंड सौंदर्य !
कलशपूचा पाडाव एकटया बुधगुप्ताने केला. आणि त्याने जिंकून घेतली आकारांची आणि जाणिवांची अशी संयोगभूमी जिथे आता पाषाणांचे सोहळे उमलले आहेत.
भूपाली निसळ.

Wednesday, 10 April 2019

सौमिक ...




अश्वत्थाच्या पानांची सळसळ अंगांगी जाणवत होती. पानांमधून भिरभिरता हिरवा वारा त्याला लपेटून घेणारा. त्याच्या चित्राच्या चौकटीवर हलत्या पानांचा ऊन सावलीचा लपंडाव हळवा होऊन उतरत होता. श्रीहरीच्या मुकुटातल्या मोरपिसागत आज त्याचा कुंचला हळुवार झाला.
आज कृष्णलीला उतरत नव्हतीच रंगांतून... प्रत्येक रंग वल्लरीचा होता. तिच्या हसूचा, तिच्या पापण्यांचा, तिच्या मोहाचा, तिच्या सायीच्या हातांचा रंग. त्याने उसासा टाकत वर सळसळत्या अश्वत्थाकडे पाहिलं. पानांच्या हालचालीने त्याचा हात जागीच थरथरला.
पाठमोऱ्या कृष्णाला चेहरा नव्हता. कसलेल्या शरीराचा भाग असलेली त्याची पाठ त्याने त्याच्या पिळदार हातांच्या मागच्या घडीने अर्धवट झाकून टाकली होती. त्याचे मानेवर रुळणारे केस कालिंदीवरून येणाऱ्या निळ्या वाऱ्याने हळुवार उडत होते. आजचा कृष्ण स्वस्थ नव्हता, आजचा कृष्ण स्थिर नव्हता. चित्रातून वाहणारी कालिंदी आज कृष्णाहून जास्त जिवंत वाटत होती. खळाळत जात तिने डोंगरापलीकडला रस्ता धरलेला. तिथून वळून अदृश्य झालेली कालिंदी, आज डोंगरामागूनही जाणवत होती. नितळ प्रवाहाच्या हातात हात घालून येणारी पायवाट माधव न्याहाळत असावा.
आठवांना वळसा घालून कुंचल्यातून रंग आस्ते आस्ते येत होते. ‘आत्ताच तर भेटून आलो आहे मी माझ्या वल्लरीला. तिचे खांद्यावरून छातीवर रुळलेले केस आत्ताच तर स्पर्शून आलो आहे. तिच्या कांतीच्या छटा पुरत्या विरघळल्या देखील नाहीयेत अजून माझ्यात, मग मला का आठवतीये ती इतक्या आवेगाने पुन्हा पुन्हा ?’
त्याने कुंचल्याचा रंग बदलला. गडद आकाश किनाऱ्याला झाकोळू लागलं. श्रीकृष्णाची छबी अजुनाजून उत्कट भासू लागली.
अश्वत्थाच्या सावलीने त्याला गहन व्याकुळ केलं. सावली पलीकडच्या उजेडाच्या ज्वाळेत स्वतःलाच उभं करून प्रायश्चित्त घ्यावं असं त्याला सतत वाटू लागलं. चित्रातून डोकावणाऱ्या वल्लरीला तो बाजूला सारू शकत नव्हता. तिच्या वस्त्रांचे किरमिजी तरंग, कुंचल्यातून त्याला वेढत राहिले.
श्रीहरी कोणाची वाट पाहतो आहे ? कालिंदीचा खळाळ त्याच्या पावलांना अस्थिर करतो आहे. पलीकडल्या रानातून हिरव्या गालिच्यावर दुडदुडणाऱ्या पाडसाने कृष्णाच्या पाठमोऱ्या आकृतीला अस्फुटसा नाद दिला आहे.
चाहुलीचे पडघम आत वाजत आहेत कि चित्रात ? तो चौफेर नजर फिरवतो. रंगातून विलग केलेला कुंचला रंगांवरून फिरवत तो नेमकी छटा शोधतो आहे.
बहुदा आज संयमाचा रंग सापडणे कठीण आहे.
भूपाली निसळ.

Wednesday, 6 March 2019

सोहळा



                हाय वे वरून त्याने गाडी आतल्या रस्त्याला घेतली. मधली दोन तीन छोटी गावं मागे पडली तशी आता दुतर्फा लाल माती दिसायला लागली. झाडपानांचा रंग जिवंत हिरवा व्हायला लागला.  “ कोंकण ” …..
नजरेसमोर गाव दिसायला लागलं. उतरत्या कौलांची झिरमिळ, हिरव्या रंगातून लकाकत होती. आजोळची माया समोर दिसणाऱ्या गावावर, त्याच्या डोळ्यातून पसरत राहिली.
घरी पोहोचेपर्यंत अंधारून आलं. फाटकातून गाडी आत घेताना, आजी तुळशीपाशी दिवा लावताना दिसली. “आलास का, ये ये ...” आजोबा लगबगीने बाहेर आले. त्याची त्या दोघांबरोबरची संध्याकाळ पडवीतल्या कंदिलाच्या प्रकाशात उजळून निघाली.
सकाळी चहाचा कप घेऊन आदित्य परसदारच्या बागेत गेला. आजोबा नेहमीप्रमाणे सकाळी लौकरच बागकामाला लागले होते. पानांवरून हात फिरवत, झाडांशी फुलांशी बोलत त्यांचं काम चालू होतं. आंबा, फणस अश्या मोठया झाडांपासून कितीतरी फुलांनी बाग रंगीत केली होती. झाडांचे वाफे नीट करता करता आदित्यशी त्यांच्या गप्पा चालू होत्या, “ आंब्याचा मोहोर बघ आदित्य. या वर्षी भरपूर आंबे येतील या झाडाला.”
आजोबा आणि आजी दोघांनी वयाची ऐंशी ओलांडली होती. दोघं एकमेकाशी घट्ट जोडले गेले होते. एकमेकाला जपत होते. “ तू माझ्याआधी जाऊ नकोस बरं का !” आजोबा आजीला सांगायचे.
आजोबा गेले. आदित्य गावी पोहोचला. बागेतल्या आंब्याचा मोहोर पुरता गळून गेला होता. झाड एकाकी वाटत होतं, बाग एकाकी वाटत होती, आजीसारखीच.
“ एकटी कुठे राहतेस आजी, चल माझ्या सोबत. वाटलं तर परत येऊ दोघं.” आदित्य म्हणाला. “ अरे मी आले तर बागेकडे कोण बघणार ? तुला माहिती आहे ना आजोबांचा किती जीव होता बागेवर ?”
हो .. नाही करत आजी आदित्य सोबत त्याच्या घरी आली.
आजोबांच्या आठवणी, त्यांचं भरभरून जगणं एकमेकाला सांगत दोन तीन महिने उलटून गेले. “ गावी जाऊया का रे दोन चार दिवस ? घराची फार आठवण येते आहे. ” आजीने आदित्यला विचारलं.
“ जाऊया ना. घर, बाग एकदा बघून यायला हवी.” आदित्य म्हणाला.
बाग पुरती सुकली होती. सगळीकडे गवत वाढलं होतं. आदित्यने घर आवरायला आजीला मदत केली आणि तो बागेकडे वळला. गवत काढून, झाडांना पाणी घालून तो पडवीत येऊन बसला. अंधारू लागलं तसं आजी देवापुढे दिवा लावून, कंदील घेऊन त्याच्या शेजारी येऊन बसली. “ थोडे दिवस इथेच थांबूया आजी. मी रजा टाकतो.” तो म्हणाला. आजीने उत्तरादाखल का होईना पण हालचालही केली नाही.
रोजच्या निगुतीने बागेने पुन्हा पहिलं रूपड घेतलं. टवटवीत हालचालीने घराला जिवंतपणा आला. एक आठवडा गेला असेल नसेल, आजीने बिछाना धरला. “ माझं जे काही व्हायचं इथेच होऊ दे रे बाळा.” ती आदित्यला सांगत राहायची.
आजीही गेली. आदित्यने नोकरी सोडली आणि तो कायमचा गावाकडे परतला.
आदित्य गावाकडे राहतोय त्याला आता काही महिने लोटले आहेत. झाडं बहरली आहेत. कळ्या उमलून आल्या आहेत. फळांची छोटी छोटी रुपडी डोळ्यांना मोहवत आहेत.
आजोबा गेल्यावर एकही फुल फळ नसलेली बाग. आज आजी गेल्यावर ... दोघंही गेल्यावर बहरली आहे. प्रत्येक फांदीवर दोन फुलं.. दोन फळं अश्या सोहळ्याने.

भूपाली निसळ.

Thursday, 31 January 2019

वॉल ऑफ इअर्स (Wall of ears)




चौकातून सायकल वळवत तिने समोर दिसणारा क्लास गाठला. तिच्या लहान उंचीला ताईची सायकल जड होत होती. सिटवर न बसता, उभ्यानेच पायडल मारत ती क्लासपर्यंत पोहोचली. कसाबसा स्टॅन्ड लावला, स्कर्टच्या खिशात किल्ली टाकत ती वाडयात शिरली.

छोटया जुन्या वाडयात, पुढे आलेल्या एका खोलीत तिचा तबल्याचा क्लास असायचा. मध्यभागी खाली वर फरश्या झालेला छोटा चौक, डाव्या बाजूला क्लासची खोली, त्याच्या काटकोनात असणाऱ्या दारामागे एक दोन खोल्यांचं घर. उजव्या बाजूला दोन दारं. एका दाराला जळमटांनी झाकून टाकलेलं, गंजलेलं कुलूप. दुसऱ्या दारासमोर डालडाच्या डब्यात लावलेली तुळस वाऱ्याने हलायची, तेवढीच काय ती जिवंतपणाची खुण.
तबल्याचा क्लास मात्र सकाळी दोन तास आणि संध्याकाळचे तीन तास त्या भागातली सगळी शांतता गिळून टाकायचा. गुरुपौर्णिमा एका आठवडयावर आली होती. क्लासचे सगळे शिकाऊ तबलजी कार्यक्रमाच्या तयारीला लागले होते.
सरांनी लहरा धरायला पेटी पुढे ओढली तसं सर्वांनी आपापली जागा पकडत बसून घेतलं. ती आत आली, जागा नाहीशी पाहून तिने दारातच मांडी घातली. एक एक विदयार्थी येऊन, सरांनी ठरवून दिलेलं वाजवून जात होता. तिची नजर समोरच्या सरावावर तर पाठीचे डोळे मागची हालचाल टिपत होते.
शेजारच्या घराचा पडदा आज जरा बाजूला सरला होता. आतलं स्पष्ट अस्पष्टस दिसतं होतं. ती पुन्हा पुन्हा तिकडे वळून पहात होती. सगळ्या वाडयात, क्लास सोडून फक्त याच घराला जाग होती. आत नेहमी गडबड गोंधळ चालत असणार असं बाहेरूनच त्या घराच्या भिंती पाहून वाटायचं.
बहुदा जोडपं असावं. त्यांची सततची ये जा त्या जागेला वेग देत होती. आवाज अगदीच अस्पष्ट होता. ते काही बोलत असतीलच तर काही कळत नव्हतं. तबल्याचा आवाज आजुबाजूच सगळं मिटवून टाकत होता. सराव झालेली मुलं खोलीबाहेर पडताना त्यांचे पाय तिच्या नजरेआड येत होते. आणि ती पुढे मागे होतं नजरेने त्या दोघांच्या हालचाली न्याहाळत होती.
सरांनी तिला हाक मारली. मान सरांकडे वळवत तिने विचारलं, “ काय सर?”
“ लक्ष कुठे आहे तुझं ? चल येऊन बस समोर.”
क्लासमधे शेवटची दोन चार मुलं राहिलेली दिसली. ‘आपलं इतका वेळ लक्ष नव्हतं ’ विचार करत करत ती समोर येऊन बसली. तिच्या उंचीशी, तबल्याची जोडीही शर्यत लावायची. मात्र तिच्या हातांच वजन कुठेही कमी पडत नसे. सरांनी लहरा सुरु केला आणि समेवर येत तिची बोटं वाजू लागली. कुठे शोधूनही चूक नाही कि उसंत नाही. एक एक बोल टपोरा होऊन येत होता. ऐकणाऱ्याच्या कानांना तिचा इतरांपेक्षा असणारा वेगळा तबला कळायचा, जाणवायचा.
सलग वीस मिनिटं वाजवून ती थांबली. दारात शेजारच्या घरातलं ते जोडपं येऊन उभं राहिलं. ‘ आपण त्यांच्या घरात पहात होतो हे कळालं कि काय यांना ’  तिला मनातून वाटून गेलं. सगळ्यांमधून काही क्षणांची शांतता पिंगा घालून गेली. तिथल्या सगळ्यांच्याच नजरा त्या दोघांवर आणि त्या दोघांच्या मात्र तबल्यावरच्या निमुळत्या लांब बोटांवर स्थिर झाल्या होत्या.
दोघांचे डोळे तुडुंब झालेले. झराझरा वाहून जाईल सगळं असं वाटत होतं. त्याने खुणेनेच तिला छान झाल्याचं सांगितलं. आणि तो तिला हे पुन्हा पुन्हा खुणेनं सांगू लागला. मधूनच तबल्याकडे बोट दाखवत ते बोट तो तिच्याकडे वळवायचा आणि छान झालं असं खुणावत राहायचा. तोंडाने आ.. आ आवाजापलीकडे तो काहीही बोलत नव्हता. त्याच्यामागे उभ्या बायकोने टाळ्या वाजवायला सुरुवात केली, तसं तो हि हातांची उघडझाप करू लागला.
तिला समोर घडत असलेलं, आत झिरपेना. ‘ त्यांना नक्की काय म्हणायचंय ’ तिने सरांकडे पाहिलं.
“ तू छान वाजवलंस म्हणताहेत ते...” सरांना तिचा प्रश्न कळला.
“ पण मग ते असं का सांगत आहेत ?” तिचा पुढचा प्रश्न.
“ ते मुके बहिरे आहेत. दोघंही..”
“ काय ? ” तिने त्या दोघांकडे पाहिलं. दोघं किती कौतुकाने तिच्याकडे पहात होती.
आता त्याने पुन्हा खाणाखुणा सुरु केल्या. खुणांमधून तुझा तबला ऐकून अंगावर काटा आला हे तो न थांबता कितीतरी वेळा सांगत राहिला.
“ ऐकला ? कसा ऐकला ?” ती आता सावरली आणि तिनेही खुणेनेच त्या दोघांना विचारलं.
तो वळला. त्याने पाठीमागच्या भिंतीवरून मायेने हात फिरवला. मग त्याने भिंतीला कान लावला आणि डोळे मिटून घेतले. त्याच्या मिटलेल्या डोळ्यांतून एक टपोरा आवाज ओघळला आणि भिंतीत मिसळला. कायमचा.    
भूपाली निसळ.


                              

Tuesday, 15 January 2019

पद्मनाभ




जिजाऊचं माहेर सिंदखेडराजा, त्यांच्या जन्मोत्सवासाठी बंदच असेल आम्हाला कल्पना नव्हती. गावाच्या अलीकडे सगळे रस्ते बंद, गाडी वळवून परतीला लागावं इतकाही मार्ग मोकळा नाही. आम्ही रस्त्याखालून गाडी घातली. सिंदखेडराजाला वळसा घालणारा, खेड्याखेड्यांतून जाणारा रस्ता आम्ही चौकशी करत करत धरला आणि पुन्हा मुख्य रस्त्याला लागलो. लोणारचा शेवटचा २० किलोमीटरचा टप्पा म्हणजे आतला, दगडमातीचा आणि खड्ड्यांचा... मान,पाठीची कसोटी पाहणारा.. पण लोणार पाहण्यासाठी हि बाबच क्षुल्लक.  या रस्त्याने जाताना एकाला रस्ता विचारला. त्याने वाकून, खिडकीतून गाडीभर नजर फिरवली. “तुमच्यासोबत एकही पुरुष माणुस नाही ?”              त्याचा प्रश्न..                                                                      
“तुम्ही आत्ता जिजाईंचा जन्मोस्तव करून आलात ना?” प्राजक्ताचं त्यांना लगोलग उत्तर.
लोणार म्हणलं तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं उल्का पडून तयार झालेलं सरोवर. पण वास्तवात लोणार या पलीकडे खूप काही आहे. मुळातच हे सरोवर उल्कापाताने तयार झालं कि अशनीपाताने कि ज्वालामुखीमुळे यांवरच मतभेद आहेत. त्यामुळे याच्या निर्मितीची वेळही मतभेदात अडकलेली आहे. कोणी म्हणतं साडेसहा लाख वर्ष तर कोणी म्हणतं बावन्न हजार वर्ष.
सरोवर, त्याच्या काठावरची चुंबकाला चिकटणारी माती, चुंबकीय गुणधर्म दाखवणारे दगड, बाजूचं अभयारण्य, प्राणी, पक्षी .. मंदिरं ... लोणार म्हणजे पुराणातल्या कथा आणि विज्ञानाचा संगम..
तिथल्याच एका मंदिरात हे पिल्लू भेटलं.. नाव पद्मनाभ ! खांद्याला पिशवी अडकवून आमच्या मागोमाग गाभाऱ्यात आला. आम्ही न विचारताच त्याने मूर्तीची माहिती दयायला सुरुवात केली. “कश्यप ऋषी आणि त्यांच्या तेरा पत्नींपैकी एक दिती यांचे गयासूर, कोल्हासूर आणि लवणासूर हे तीन राक्षसपुत्र होते. त्यातील लवणासूराचा वध विष्णूने इथे केल्याची आख्यायिका आहे. म्हणूनच हि मूर्ती अशी आहे.” त्याने माहिती दिली. नंतर तो आमच्याबरोबरचं होता. मंदिरावरच्या शिल्पांची त्याला माहिती होती (अर्थात कामशिल्प सोडून). तो, त्याला विचारलेलं शिल्पं माहितीपूर्ण सांगत होता, त्यामागची कथा सांगत होता. पाषाणातलं वैशिष्ट्य सांगत होता. पुराणातले दाखले देत होता.
इथल्या सुर्यप्रतिमेच्या पायात गमबूट आहेत ( हि प्रतिमा भारतीय नाही). “ पद्मनाभ, सुर्याला का रे बूट?”
त्याला विचारलं. “मग त्याने जर बूट नाही घातले तर पृथ्वीला त्रास होईल ना..” त्याच्या वयाच्या आवाजात हे उत्तर ऐकायला फार भन्नाट वाटलं.
“ शाळेत जातोस का?” मी विचारलं.
“ हो जातो ना, तिसरीत आहे मी. पण मला आवडतं इथे. शाळा सुटली कि येतो इकडे..” त्याचं उत्तर.  
चालुक्य, राष्ट्रकुट, होयसाळ, यादवकालीन अश्या वेगवेगळ्या मंदिर पद्धतींचा इथे मिलाफ दिसतो. पद्मनाभ या सगळ्याचा अभ्यास करत करत मोठा होणार आहे हे निश्चित. कारण इथेच त्याला अभ्यासायला ३२ मंदिरं, १७ स्मारकं, १३ कुंड आणि ५ शिलालेख आहेत. नुसती मंदिरं आणि त्यावरची शिल्पच नाहीत तर पद्मनाभला सरोवर, त्याच्या आजूबाजूची झाडं, प्राणी, पक्षी यांचीही खूप छान माहिती आहे. तिथे असणाऱ्या कुंडाच्या पाण्याबाबत शास्त्रीय आधार देत तो कारणं देतो (या कुंडाचे निम्मे पाणी खारट तर निम्मे गोड आहे).
वयाला साजेसा हट्टही आहेच त्याच्याकडे. घरी चला ना हा त्याचा हट्ट फार प्रेमाचा, लाघवी होता. त्याला टाटा करताना, आम्ही त्याच्या घरी न गेल्याचं हिरमुसलेपण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.
पद्मनाभ खूप छान मोठा होतो आहे. पद्मनाभ मोठा झाला कि मी त्याला पुन्हा भेटणार आहे.

भूपाली निसळ.

Sunday, 6 January 2019

बात .. दूर तलक जायेगी.






          थंडी कातडयातून हाडांपर्यंत शिरत होती. हात एकमेकावर चोळत तो तोंडाने मुठीत गरम हवा फुंकत होता. रात्री अकरा वाजता येणारी गाडी, त्याच्या स्टॉपला यायला साडे अकरा वाजून गेले. तिथून तो एकटाच बसणारा असल्याने , त्याने पाय टाकताच गाडी निघाली. टू बाय वन सिट्स असणारी गाडी ड्रायव्हरमागे प्रशस्त दिसतं होती. बाहेरच्या थंडीच्या मानाने आतली हवा उबदार , हलकी वाटत होती. निषाद एकल्या सिटच्या रांगेतल्या त्याच्या तिसऱ्या सिट वर येऊन बसला.
मोकळी ढाकळी सिट त्याला सैलावून गेली. एकाच खुर्चीची रांग असल्याने , हात ठेवायच्या पट्टीवर कोणाही बरोबर चढाओढ होणार नव्हती. त्याने त्याच्याच हक्काची जागा असल्यासारखं , पट्टीवर हात ठेऊन घेतला आणि डोकं मागे टेकून तो निवांत झाला.
बस गावाबाहेर पडली. आता गाडीला वेग आला. भणाणा वारं खिडकीतून अंगावर आदळायला लागलं. निषादने खिडकी लावली आणि बाहेरची धावती दुनिया डोळ्यांना दिसतं राहील असा पडदा सरकवून घेतला. फिल्म लावलेल्या काचेतून , अंधार अजूनच काळा होऊन त्याच्यापर्यंत पोहोचत होता. परतणा-या गाडयांचे झोत पलीकडच्या पाटातून वाहत होते , त्यामुळे त्याला एकसंध मिट्ट सावली अनुभवता येत होती.
गाडीतल्या प्रत्येक खुर्चीच्या वरती , रिडिंग लाईट ची सोय केलेली होती. एव्हाना बारा वाजून गेल्याने बहुतेकांनी दिवे बंद करून , डोळे मिटून घेतले होते. गाडीला आलेला वेग त्याला आवडत होता. स्वतःपुरती तयार झालेली धावती दुनिया त्याला आपल्या मोहात पाडत होती.
त्याने वरच्या बाजूला ठेवलेल्या सॅकमधून पुस्तक बाहेर काढलं. डोक्यावरचा दिवा अॅडजेस्ट करतं , खुण ठेवलेल्या पानांमध्ये आपली बोटं बुचकळली . पुस्तक उघडून काल थांबवलेल्या ओळीचं बोट धरून त्याने पुढे वाचायला सुरुवात केली.
जेमतेम दोन पानं वाचून झाली. दिवसभराची कामाची धावपळ आता शरीरातून डोळ्यात उतरायला लागली. त्याने पुस्तक मिटून ते पुढच्या सिटच्या , मागच्या बाजूच्या कप्यात ठेवून दिलं. डोक्यावरचा दिवा बंद केला तसं, बाहेरच्या रस्त्यावरची दिव्यांची ये जा जास्त प्रखर वाटायला लागली. ड्रायव्हर समोरची मोठ्ठी चकचकीत काच , रस्त्यापासून निघून वर ढगांपर्यंत सारी दुनिया व्यापून घेत असावी असं भासत होतं. काचेतून मागे सरणारे , हिरवे राघू सळसळताना दिसतं होते. अधूनमधून त्यांच्यावर पडणारा एखादया गाडीचा झोत , त्यांना हिरवी लकाकी देत होता.
निषादने सिटची पाठ थोडी मागे केली आणि डोळे मिटून घेतले. झोपेतही गाडीचा वेग जाणवत होता. त्या वेगाने झोपेला शांतपणा नसला तरी शरीर मोकळं वाटत होतं. 
गाडी थांबली. ब्रेकच्या हलक्याश्या स्वल्पविरामाने , निषादला जाग आली. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. धाब्याचा मरगळलेला , जून प्रकाश अंधारातून रस्ता काढत होता. त्याने काही क्षण पुन्हा डोळे मिटून घेतले. मनगट डोळ्यांसमोर आणून मग त्याने डोळे उघडत घडयाळ पाहिलं. तीन वाजत आलेले. त्याने पुन्हा बाहेर नजर टाकली. धाब्याच्या पुढच्या बाजूला असणा-या चहाच्या टपरी समोर , पब्लिक गोळा झालेलं दिसतं होतं. त्यांच्या पलीकडून , चहाच्या वाफा भुरभुरत होत्या.
निषादला चहाची तल्लफ आली. सिटवरून उठताना त्याला अवघडलेल्या पायांची जाणीव झाली आणि तो क्षणभर थांबला.
दारापलीकडे , असलेल्या जमिनीवर थंडी ओसंडून वाहत होती. निषादने जर्किनची चेन वर गळ्याशी घेत इकडे तिकडे नजर टाकली. आजूबाजूला अजून दोन तीन गाडया उभ्या होत्या. गाडयांमधली झोप प्रत्येक खिडकीशी जाणवत होती.
अंधार उजेडाच्या सीमेशी , एक गावातला माणुस , दोन पायांवर निवांत बसला होता. त्याला कसलीच घाई नसावी बहुदा , अगदी झोपेची सुद्धा ! त्याच्या हातातल्या बिडीचं टोक , तोंडाजवळ आलं कि प्रकाशरक्तिम व्हायचं. त्याने नाका तोंडातून सोडलेला धूर , इतका निवांत होता कि दोन क्षण निषादला छातीभर धूर हवेत सोडायचा मोह झाला.
टपरीशी येत त्याने कटिंग सांगितला. गर्दीपासून अलग होत त्याने टपरी मागची एक जागा निवांत केली. टपरीवाल्याने , टेपरेकॉर्डरवर लावलेली गझलांची कॅसेट, रात्रीचं जागलेपण हुरहूरं करत होती. टपरीवाल्याची हि आवड निषादला आश्चर्याने तिथेच रेंगाळत ठेवत होती.
काचेचा ग्लास , निषादने दोन बोटात पकडला. काचांमधल्या पोकळीच्या बुडबुडयाने त्याला उगाचच जागलेपण जाणवलं. चहाचा पहिला घोट घेत त्याने पुन्हा एकदा नजरेसमोर आणत , ग्लास न्याहाळला. 
 वाफेने पांढुरक्या भिजलेल्या काचे पल्याड मध्यरात्रीचं जाग जग दिसतं होतं. थंडाई पांघरलेल ते इवलाल गाव या रस्त्याने जागं ठेवलं होतं.
कॅसेट वरची कुठलीशी गझल संपली. कान फारसे तिकडे नसल्याने , गाणं कानांवर पडत होतं पण मेंदूपाशी व्यक्त होत नव्हतं.
दोन गझलांच्या मधली पोकळी , खूप लांब वाटावी इतकी शांतता निषादला जाणवली. त्या पोकळीने त्याला पुढच्या गझल कडे खेचून घेतलं.
सुरवातीच संगीत सुरु झालं. गिटार वरच्या तारा छेडल्या गेल्या. ओळखीचं काहीतरी ऐकतोय असं त्याला वाटायला लागलं. 
अवघ्या काही क्षणात , जगजीतच्या आवाजाची जादू कानांवर पडायला लागली.
‘ बात निकलेगी तो फिर , दूर तलक जायेगी ...’
निषादने चमकून टपरीकडे बघितलं. सगळे लोकं आपापल्या ठिकाणी गुंतलेले दिसतं होते. चहावाला, भराभरा चहा ग्लासांतून भरत पुढे सरकवत होता.
सुरु झालेल्या नज्मने कोणालाच काहीच फरक पडला नाहीये. मग मलाच काय जाणवतंय आतून ?

                                पिंपळ सावलीच्या, कुशीतलं मातीचं घर. घराच्या बैठकीच्या खोलीत एका भिंतीशी दोन पत्र्याच्या खुर्च्या, त्यातल्या एकीची पाठ मोडून नुसताच दांडा शिल्लक राहिलेला. समोरच्या भिंतीलगत चटई अंथरलेली. आढयाच्या लाकडातून कधी कधी छपराची माती थेंब थेंब खाली यायची. चटई शेजारच्या कोपऱ्यात जुन्या, रंग उडालेल्या स्टुलावर बाबांनी हौसेने घेतलेला टेपरेकॉर्डर !
बाबांच्या संग्रहात , जुन्या नवीन गाण्यांच्या अनेक कॅसेट्स. रोज संध्याकाळी टेपरेकॉर्डरवर मैफिल जमून यायची.
बाबांच्या आवडत्या गझलां पैकी एक , त्यांची लाडकी नज्म ! मन लावून , मनसोक्त गाणारे बाबा त्याच्या डोळ्यांसमोर येऊन गेले.
आनंद वाटून टाकणाऱ्या बाबांनी कोणाला तरी देऊन टाकली ती कॅसेट. कितीतरी पुस्तकं , कॅसेट्स बाबांच्या जाण्यानंतर घरी परतल्याच नाहीत. किती शोधली आपण हि कॅसेट, हि नज्म. नाही मिळाली तेव्हा. आणि आज अशी अचानक , इतक्या थंडीतही उबेचा आनंद देते आहे.
गझल चंद्राच्या पाकळ्यांगत उमलून माहौल बनवत होती. कितीतरी वर्षांनी काहीतरी हरवलेलं सापडलं म्हणून तो कानाचे आभाळ करून ती ऐकत राहिला.
कितना हुवा ? त्याने रिकामा ग्लास समोर ठेवत चहावाल्याला विचारलं.
“ तीन रुपये साब.”
निषाद हसला. पाकीट काढत त्याने विचारलं , “ और कॅसेट का ?”
“ जी ?”
“ वो जो टेप में है कॅसेट , उसका ?”
चहावाला त्याच्याकडे पहात राहिला.
“ अरे यार , मुझे वो कॅसेट चाहिये. उसका कितना दू ?”
“ ले लो ना साब ” टेप मधून कॅसेट काढत , त्याने ती निषादच्या हातावर ठेवली.
“ कितना दू ? ” निषादचा त्याला पुन्हा प्रश्न. 
“ इसका क्या मोल लगायेंगे ? रखलो... ” म्हणत त्याने निवांत चहा ढवळायला सुरुवात केली.
त्याच्या खांदयावर हात ठेवत निषाद इवलाल हसला. उत्तरादाखल तो हि हसला. हसताना त्याचे डोळे लकाकले.
पाठीमागे उभी गाडी सुरु झाली. निषाद गाडीकडे वळला. दाराशी येत त्याने पुन्हा टपरीच्या दिशेने पाहिलं. चहावाला , नवीन गर्दीला चहा देण्यात गुंतून गेला होता.
काय म्हणायचं असेल त्याला .... मेरे बारे में कोई बात ना करना उनसे.. बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी ....”

भूपाली निसळ.


   














   

Tuesday, 1 January 2019

रामदास गुरु माझें आई ...



सातारा सोडून आमची फियाट गाडी, उजवीकडे सज्जनगडाकडे वळायची. वळणाआधीचा बोगदा गाव मागे पडत असल्याचं सांगायचा. एकदा का गाडी वळली की मी, सोबत आणलेल्या तीन उश्या सिटवर ठेऊन, त्यावर बसायचे. खिडकीपर्यंत नीट पोहोचता यावं आणि खिडकीबाहेर डोकावता यावं, यासाठी ही सगळी तयारी असे. मग भन्नाट वारा झेलता यायचा. हिरवे डोंगर नजरेत यायचे. गाडी काही वेळाने घाट चढू लागायची नि मी स्तिमित होऊन बाहेर पहात राहायचे. सज्जनगडाच्या निम्म्या डोंगरावर असणाऱ्या वाहनतळावर तेव्हा फक्त आपलीच गाडी पाहून भारी वाटायचं. ही सज्जनगडाच्या आठवणीतली पहिली आठवण !
काय आकर्षण होतं त्या जागेत, जे आजही तितकंच टिकून आहे, हे मात्र कळत नाही. बाबांनी पहिला ओमकार गडाच्या गाभाऱ्यात शिकवला. ओमकारापलीकडची चौथी तुर्यावस्था ... तिचा पहिला अनुभव सज्जनगडावरचाच. अनामिक ओढ .. भारावलेपण, माया, भक्ती, चैतन्य हे सारं एकाचवेळी एकाच ठिकाणी अनुभवणं हे नेहमीच शब्दातीत वाटत आलं आहे.
पुढे गाडीचं स्टीअरिंग माझ्या हातात आलं आणि मी मनात येईल तेव्हा, सज्जनगड आणि शिवथरघळीच्या (शिवतर) वाऱ्या करू लागले. गाभाऱ्यातून रामदासांच्या समाधीपर्यंतचा प्रवास अनेक मानसिक आंदोलनांचा होता. खूप मोठी जबाबदारी अंगावर येऊन पडली होती आणि मी नवख्या जगात एकटयाने लढायला बळ एकवटत होते.
समाधीसमोर गेले कि उमाळे यायचे आतून आणि मी हमसून हमसून रडायचे. समाधीचा स्पर्श मला अतोनात बळ देऊन गेला. तो स्पर्श माझ्या बोटांच्या टोकांवर घट्ट पेरून ठेवलाय मी. रामदासांना हनुमंताने दिलेली वल्कल हातात घेताना... अंगातून वीज वाहावी इतकं तेज जाणवत होतं. हे माझ्या आयुष्यभरासाठीचे अनुभव आहेत.
वरंधघाट ... आता सिटवर बसायला उशीची गरज नसते. मला खिडकी आणि समोरची अख्खी काच मिळालेली असते. घाटरस्ता उंचच उंच चढत राहतो, उंचच उंच नेत राहतो. भक्कम वळणांच्या घाटाला आता भिंती उभ्या केल्या आहेत. माझ्या आठवणीतला वरंध म्हणजे ... रस्ता आणि दोन्ही बाजूंना खोल दरी !
घाटमाथ्यावर गाडी बाजूला घ्यायची आणि फक्कड चहा सांगून समोरच्या दरीकडे जायचं. निसर्गाचं ते रूप पाहून आपण बिंदूसमान असल्याची जाणीव तिथूनच रुजायला लागते. ‘ तू कोण? ’ असे प्रश्न मनाशी सुरु होतात. समोर पसरलेल्या दरीतून अनेक पायवाटा आपल्याला शिवथरघळीपर्यंत नेणाऱ्या आहेत हे माहित असतं. खालचं निबिड जंगल पाहून, माहितगार वाटाडयाशिवाय असं जाणं शक्य नाही हे लक्षात येतं आणि आपण निमूट गाडीत येऊन बसतो. (इथेच ही अवस्था तर, हेळवाक घळीच काय बोलावं. कोयनामाई धावते शेजारून. भोवताली मोठमोठे कडे, दाट जंगल आणि वाघ,अस्वल,लांडग्यांचा वावर... कसे पोहोचले असतील रामदास स्वामी तिथे? कसें राहिले असतील?) 
पुढे घाटातच शिवथरघळीकडे जाणारा एक रस्ता दिसतो. पण तो फार पायाखालचा नाही. घाट संपतो तेव्हा निसर्गाने आपल्याला पुरतं जमिनीवर आणलेलं असतं. थोडं पुढे गेल्यावर, उजवीकडून रुळलेली वाट आपल्याला शिवथरघळीकडे घेऊन चलते. इथून जगाशी संपर्क तुटावा असे आपण पुढे जात राहतो. उंच डोंगर हिरवेपण ल्यालेले असतात. हिरवी झाडं, धुक्यातून डोकावत असतात. साऱ्या आसमंतात भरीव गाज असते .. “ ओम ” !!!
अमानिक ओढीने आपण शिवथरघळ येण्याची वाट पाहत, पुढे पुढे जात राहतो. आता ऐकू येऊ लागतो प्रपात ... जलप्रपात .. उभ्या सह्याद्रीच्या उंच कातळातून ओसंडून वाहणारा प्रपात .. शिवथर .. शिवथरनदी स्वतःला खाली झेपावून वाहत राहते ओथंबून. प्रवाहाकडे पाहिलं कि वाटतं, या पाण्याने पाहिलंय रामदासांना ! हा प्रपात नतमस्तक तर होत नाहीयेना, रामदासांच्या पायाशी ! चहूबाजूंनी नजर फिरू लागते आणि सगळ्या बाजूंनी व्यापून असतात सह्याद्रीचे कडे, घनदाट झाडी.. आज इतकी घनदाट झाडी, तेव्हा काय असेल.. सारं अगम्य !
पायऱ्या चढून, आपण घळीकडे जात राहतो आणि सर्वांग थरथरत असतं. डोळे भरून येतात ..अवघ भारावलेपण जगत आपण लीन होतो, नतमस्तक होतो. आता ओसंडून वाहणारा प्रवाह जवळ येऊ लागतो. त्याचा प्रचंड रोरावता आवाज साऱ्या देहाभोवती लपेटून राहतो. वाऱ्याने उडणारे तुषार, घळीत प्रवेश करण्याआधी जणू काही मनावरचं मळभ धुवून टाकतात आणि आपण घळीत प्रवेशते होतो. वरून कोसळणारं...शेजारून वाहणारं पाणी, झाडांची सळसळ निसर्गाची लय सांगत असतात आणि समोर असतात ... समर्थ रामदासस्वामी !
सारी घळ कवेत घ्यावी आणि रामदासआईने कुठूनतरी समोर यावं या जाणीवा प्रखर.. अजून प्रखर होत जातात.
दासबोध... आत्माराम ... मनाचे श्लोक किती सुंदर नावं.. ते त्यांना झालेला बोध आपल्याला सांगतात, ते मनातून उमलून येणारे शब्द, श्लोक आपल्याला सांगतात. आपल्या आतच असलेली उत्तरं शोधायची आणि त्यासाठी मार्ग शोधायला गुरूची मदत घ्यायची.
रामरूपी अंतरात्मा म्हणताना ते राम ही प्रवृत्ती सांगतात. अवकाशाचं ज्ञान देतात. हे सगळचं फार मोहून टाकणारं आहे आणि ताकद देणारं देखील.
रात्री तिथल्या आभाळतुकडयात दिसणाऱ्या अनंत चांदण्या ... गार वारा आणि समोर असते शिवथरघळ ...
प्रपाताच्या गजरात .. शांत, मंद ज्योतीसारखी !

भूपाली निसळ.