Monday, 6 April 2026

मनस्वी

  

             


        निर्माणाकडे जाणा-या रस्त्यावर काहूर असतं, ‘रिकामं’पण असते, एक अनामिक ओढ असते.
ती ओढ कसली आहे नाही समजत. त्यात अस्थिरता असते आणि स्थैर्यही.
आज म्युझियमच्या गेटपाशी उभं राहून आतल्या वास्तूवर नजर टाकली तेव्हा आनंद आणि निर्मितीमागच्या उसळत्या लाटा दोन्ही जाणवत होतं. त्या रस्त्याने आपण दोघं जाताना झालेल्या गप्पा आठवत होत्या. तुझी दुसरी, तिसरी .... पाचवी .. दहावी माहित नाही कितवी चक्कर होती इथे. मी मात्र नवखी!
त्या दिवशी आपण म्युझियम तुझ्या नजरेने पाहणार होतो बाबा. तुझ्या शब्दांत ऐकणार होतो. तू मला आवडलेली चित्रं, शिल्पं दाखवणार होतास. त्यांच्याविषयी भरभरून बोलायचं होतं तुला. तुझी आत जाण्यासाठीची घाई कळत होती. ‘इतक्या वेळा पाहूनही हा इतका उत्सुक कसा?’ मला आतून वाटत होतं.
कधी असं होतं ना .. रस्ता संपता संपत नाही. तुझं ‘असं’ होताना पाहिलंय मी इथे येताना, औंधच्या रस्त्यावर.
यमाईच्या डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्याशी एक वाट फारकत घेते. तिला लांब लांब जाताना पाहून एका ठिकाणी थांबायचास तू हमखास. त्या दिवशीही थांबलास. गाडीतून उतरून माझ्या खिडकीशी आलास.
‘उतर खाली’ दार उघडत म्हणालास.
समोर त्रिकोणातून दुसरा रस्ता दूर जाताना दिसत होता. नजरेपुढच्या त्याच्या टप्प्यात दोन्ही बाजूंनी हिरवी दाट झाडं आणि त्यांची काळी शांत सावली!
‘आपण उभे आहोत हा मार्ग, एका अश्या वास्तूशी जातो जिथे सर्जनाचा उत्सव मांडला आहे. ही समोरची वाट कलेपासून लांब लांब जाणारी वाटते मला, कमनशिबी वाटते. मागे एकदा असाच, इथेच उभा राहून पाहत होतो तिच्याकडे. ही झाडं तेव्हाचं लक्षात आली माझ्या. मग वाटलं, या वाटेचं असं तिथून जाणं म्हणजे तिचं प्राक्तन आणि ती झाडं म्हणजे तिच्या वेदनेवर निसर्गाची फुंकर असावी बहुदा...’ तू बोलत राहिलास.
आजही झाडं तशीच उभी आहेत. भर दुपारच्या उन्हाच्या काहिलीत तेवढाच रस्ता शांत भासतोय. त्या टप्प्याने दिलेली अथांग शांतता मला या म्युझियमच्या रस्त्याशी विणता येते आहे. तिथल्या झाडांचं सळसळून एकमेकाला बिलगणं म्हणजे निर्मितीची आश्वासनं असावीत, नाही का?
त्यादिवशी, गेटच्या आत पाऊल टाकताना विचारलंस, “चहा घेऊन सुरुवात करूया?”
“तुझ्याच्याने इतकं थांबवेल?” मी आश्चर्यचकित.
“चल, घेऊया..” हसत खांदयावर हात टाकलास. तुझं हे असं ‘मित्र’ होऊन जगणं प्रचंड आवडायचं मला.
तुला मुलगी–बाप नात्यापलीकडे जाता आलं, तुझ्यासोबत मला नेता आलं कारण तू मनस्वी होऊन जगलास. प्रत्येक माणसावर तू भरभरून प्रेम केलंस. ‘एखाद्या नात्यावर त्या नात्याचं लेबल लावलं की भावना, कृती, व्यक्तता सगळ्यावरच बंधनं येतात,’ तू म्हणायचास.
‘हे म्युझियम म्हणजे बाळासाहेब पंतप्रतिनिधींच कलेक्शन! काय वेडा माणुस होता तो! एकसे एक शिल्प, चित्र, संग्रह आहेत या वास्तूत! हे सगळं एक माणुस गोळा करत राहतो. एवढ्या छोटया गावात, डोंगर उतारावर दगडातून रेखीव इमारत उभी करतो आणि मग ही शेकडो कलेची प्रतिकं इथे मानाने रचली जातात. त्यांच्यातून कविता प्रसवावी असा भास होत राहतो.’ घोट घोट चहा पिताना तुझं माहिती सांगणं चालू असतं. 
रिकामा ग्लास खाली ठेवत, तू खिशातून सिगारेटचं पाकीट काढतोस. ती शिलगावताना प्रकाश पसरतो चेहऱ्यावर तुझ्या. तुझे झुरके निवांत असतात आणि तरीही डोळ्यात आतली दालनं पाहण्याची घाई गर्दी करत असते.
आतमध्ये वेगळा थंडावा असतो. बाहेर - आतच्या या एका पावलात इतका फरक कसा असतो? की आपल्याला जाणवत असते ती आतली संयत स्थिर शांतावणारी मखमल?
आपण फिरत राहिलो या दालनातून त्या दालनात. थोरामोठया कलाकारांच्या कलाकृती! त्या एखादया सामान्याने समजून न घेता पाहिल्या तरी छाती दडपून जाईल त्याची. इथे ‘तू’ सोबत होतास. तुझा शब्द न् शब्द म्हणजे मातीपासून आकारापर्यंतचा अखंड प्रवास! तू बोलत राहिलास आणि हरेक चित्र, हरेक शिल्प जिवंत झालं समोर.
एकुणात आठ हजारांवरच्या निर्मिती, इतिहास सांगणाऱ्या वस्तू, सोळा हजार नवी जुनी पुस्तकं.. साडेतीन – चार हजारांवर हस्तलिखितं! तू म्हणायचास ते बरोबरच आहे, ‘एखादा माणुस एकटा, इतकं सगळं, एकाच आयुष्यात कसं जमवू शकतो? एकत्रित इतकं सुंदर कसं मांडू शकतो?’
मी हेनरी मोअरच्या ‘मदर अँड चाईल्ड’ समोर उभी राहिले. खूप उंचीच्या त्या चौकातून तुझा खर्जातला आवाज फिरून येत होता. तुझं बोलणं मोअरचं शिल्प ‘बोलकं’ करत होतं. ‘हेनरी मोअर म्हणजे semi-abstract शिल्पांचा राजा!’ त्याची कामाची पद्धत तू अशी काही समजावून सांगितलेलीस की ते शिल्प कसं घडत गेलं असेल ते आपसूक येत गेलं डोळ्यांत.
मला तुझी आपल्या जुन्या घरातली खोली आठवते. खोलीचा दरवाजा आठवतो आणि आठवतेय त्यावरची ‘ओलेती’.
हे चित्र तू पहिल्यांदा इथे आलेलास तेव्हाच मनात भरलेलं तुझ्या. त्या चित्रावरची ओली पाठमोरी स्त्री ‘सौंदर्याचा अभिजात दाखला’ आहे! या चित्राला त्याची स्वतःची अशी भाषा आहे. त्या स्त्रीची ओली पाठ आणि त्वचेला चिकटलेली वस्त्र म्हणजे केवळ नजाकत!
ठाकूरसिंगचं हे चित्र कुठल्याश्या मासिकाच्या मुखपृष्ठावर आलं आणि वाद उभे राहिले. ओलेतीला अश्लीलतेचं वळण दिलं गेलं.
तू ज्या रीतीने ‘ओलेती’ समजावलेलंस, तेव्हा तर कुठे दिसली नव्हती नग्नता. मला वाटतं नग्नता मनात असते बघणाऱ्याच्या. अशा माणसांनी चित्रं पाहिली की कॅनव्हास परिवर्तीत होतो आरश्यात आणि त्यांच्या डोळ्यातले गढूळ रंग उतरत असावेत त्यावर.
तू काहीही म्हण बाबा, पण या चित्रासमोरून हलणं खरंच कठीण होऊन जातं. खिळून राहणं काय असतं हे इथे कळतं, एकूणच, या जागेत कळतं.
म्युझियमची दगडी वास्तू आणि मागच्या बाजूची उंच झाडं म्हणजे माहौल असतो. झाडाखालच्या बाकावर बसलं की इथला वाराही शांत, संयत जाणवतो. झाडावरची अखंड चिवचिव आपल्याला शांतावत जाते.
या झाडांच्या सावलीत ओळीने उभ्या खांबांवर असलेल्या मूर्ती म्हणजे काळाचा परीघ. आख्खं म्युझियम पाहिल्यानंतर थांबून जायला होतं. सुचतच नसतं काही. इथली सहा शिल्पं आपल्याला आरंभाशी नेऊन सोडतात. सहा ऋतूंचे सहा सोहळे अनुभवणं म्हणजे उर्जा असते.
वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर... काय एक एक शिल्प! प्रत्येक ऋतूची लय मूर्तीत उतरलेली. हरेक शिल्प त्या त्या ऋतूचं यौवन पांघरून उभं!
म्युझियमला येण्याचा रस्ता जितका अवघड आहे ना, तेवढाच परतण्याचा आहे रे. तू कसा परतायचास?मला वाटतं ते तुला माझ्यापेक्षा अधिक सोपं असावं. कारण तुझ्या सोबतीला असतील इथल्या कलाकृती, त्यांचा इतिहास, त्यांचे आकार, त्यांचे डोळे... कदाचित त्यांचे श्वाससुद्धा.
पण माझ्यासोबत असतात ती शिल्पं - चित्र, त्यांच्या अवतीभवतीचे अजूनही हवेत तरंगते तुझे शब्द, अर्थ, तुझा उत्साह आणि तुझी अस्वस्थता... मला हे सगळंच घेऊन परतायचं असतं. परत आल्यावर रोजच्या जगण्यात तुला मिसळूही द्यायच नसतं. तेव्हा मात्र मी आठवते सोबत आणलेला तू - म्युझियमच्या गेटवर सिगारेट ओढून निवांत झुरके सोडणारा...
आज तर तू नाहीसच. परतलेय पुन्हा औंधवरून. गेटपासून वास्तूपर्यंतचा रस्ता डोळ्यातून खाली ठेवता येत नाहीये आणि तिथे तरंगणारे तुझे शब्द, अर्थ, तुझा उत्साह आणि तुझी अस्वस्थता सोडत नाहीये माझं शरीर......  

भूपाली निसळ 

#aundh #shribhavani #musium #ravivarma #yamai #oleti

x

Monday, 9 March 2026

शामारण्य




गेल्या ५ -६ वर्षांचा प्रवास आत्ता डोळ्यांसमोर उभा आहे. या काळात माझी तीन पुस्तकं आली.
कल्लोळतीर्थ, अनादिसिद्धा आणि उर्णा.
‘लेखक’ म्हणून ओळख निर्माण होण्याच्या माझ्या प्रवासातले हे तिन्ही महत्वाचे टप्पे. या तिन्ही कादंबऱ्यांवर मायबाप वाचकांनी खूप प्रेम केलं. मला खूप स्नेह दिला. सर्वांची मी मनापासून ऋणी आहे.
या पुस्तकांच्या लेखन प्रवासात, अनेकदा व्यक्त होताना नेमका शब्द सापडत नसे. मग स्वतःचा नवीन शब्द आणि त्यातून चपखल भावना व्यक्त करणं याला पर्याय राहिला नाही.
असे नवीन शब्द तुम्हाला नक्कीच माझ्या तिन्ही पुस्तकात सापडतील.
काही दिवसांपूर्वी ‘राष्ट्रसेविका समिती’च्या हस्तलिखितासाठी लेख लिहिण्याचा योग आला. माझ्यासाठी विषय होता, ‘मोती होतील कामाचे’
या लेखात मागील दोन वर्षात पद्मश्री प्राप्त व्यक्तींच्या कार्याबद्दल लिहायचं होतं. मला लेख वेगळ्या स्वरुपात लिहायची इच्छा होती. तसा तो मी लिहिला देखील. (तो प्रकाशित झाल्यावर मी इथे तो share करेनच)
पृथ्वी अवकाशातून निळी दिसते याचा दाखला सर्वप्रथम सापडतो तो ‘विष्णूपुराणा’त. शिवाय ती गोल असल्याचे अनेक संदर्भ आपल्याला ‘आर्यभटीय’, ‘सूर्यसिद्धांत’, वराहमिहीराच्या ‘पंचसिद्धांतिका’ मध्ये
दिसतात.
लेखात ऋषींना आपली पृथ्वी त्रिकालदृष्टीने, अवकाशीय नजरेने कशी दिसली असेल याचे वर्णन मला करायचे होते.
सोबतच आज माणसाने निसर्गाची जी वाट लावली आहे त्याचे वर्णन येणार होते. पृथ्वी हे सर्व किती काळ सहन करते आहे, हे मला मांडायचे होते. मला या दोहोंना एकत्र जोडेल असा शब्द हवा होता.
पृथ्वीसाठी वसुंधरा, भूमी, धरणी, अवनी, मही इत्यादी कितीतरी शब्द आपण जाणतो. त्यातच एक नाव आहे ‘क्षमा’...
अवकाशातून निळी दिसणारी पृथ्वी या आशयाने मी माझा शब्द निर्माण केला ‘नीलक्षमा’
 
याच लेखात निसर्गाचे वर्णन आहे. ऋषी अथर्वांच्या नजरेतून दिसणारा निसर्ग मांडताना शब्दही तसेच येणं अपेक्षित होतं.
वाहणाऱ्या नदीच्या दोन्ही काठांनी असलेलं जंगल. हे नुसतं वन नाही तर निबिड अरण्य आहे. दाट वृक्षांमुळे खाली घट्ट सावली आहे... राखाडी, काळी सावली!
मला या अरण्याचे, खालच्या दाट सावलीचे एकत्र वर्णन येईल, असा एकत्र जोडशब्द हवा होता.
या अर्थाने मी माझा शब्द निर्माण केला ‘शामारण्य’
पृथ्वी - ‘नीलक्षमा’
निबिड अरण्य - ‘शामारण्य’
माझे हे दोन्ही शब्द पूर्णत: नवीन असून कुठेही याचा संदर्भ नाही याची मी पूर्ण खात्री केली आहे.
तुम्हा सर्वांना हे शब्द आवडतील आणि ते प्रचलित होतील अशी आशा वाटते.
भूपाली

#मराठीभाषा #नवीनशब्द #भाषासंवर्धन #मराठीशब्दसंग्रह #marathishabd #भूपालीनिसळ #bhoopalinisal


Saturday, 15 August 2020

स्पर्श विठू माऊलीचा


damaji,damaji pant,mangalwedha,sant damaji,bidar fort,Vithu mauli,vitthal,marathi stories,best marathi blog,short marathi stories


दामाजीने भेगाळलेल्या जमिनीवरून नजर फिरवली. कोरडया आकाशाचं रिकामं पोट पाहून त्याला गलबलून आलं.
पावसाने पाठ फिरवली होती. जमिनीला पडलेल्या भेगा कोरड्या होत, रोज अजूनाजून तुटत चाललेल्या.
गुरं – ढोरं चारा-पाण्याविना जागोजागी मेलेली दिसू लागलेली.
घोडयावर मांड टाकून त्याने किल्ल्याचा रस्ता धरला. दामाजी म्हणजे सुलतान हुमायूँ शाहचा धनपाल ! कामाला आणि हिशोबाला चोख असलेला दामाजी सुलतानाच्या खास मर्जीतला !
वेशीतून अश्व वेगाने आत शिरला. दामाजीने तडक कोषागार गाठले. कोषागाराच्या उंच भिंती पाहताना तो क्षणभर थबकला. त्याने डोळे मिटले. डोळ्यांसमोर आलं नदीचं निश्चल पात्र अन् हतबल प्रजा.
‘कोषागारात इतका धान्यसाठा असताना प्रजेने उपाशी मरावं ? छे..छे हे योग्य नव्हे. विठ्ठला, मी काय करावं? राज्यातील बायका-पोरं अशी तडफडताना कशी बघू ?’ तो स्वतःशीच बोलला.
‘दामाजी कोषागारातील अन्नधान्य वाटत सुटला आहे,’ सुलतानापार्यंत बातमी पोहचली.
“गिरफ्तार करून माझ्या समोर हाजीर करा त्याला” हुमायूँ गरजला.
त्याने दामाजीला आजन्म कारावासाची शिक्षा दिली. “राज्याचे कोषागार फुकट वाटण्यासाठी नाही दामाजी” तो क्रोधाने म्हणाला.
“प्रजेला खायला अन्न नाही.. नदी कोरडीठक्क पडली आहे. त्यांचे हाल मला बघवेना बादशाह,”
दामाजीने हात जोडले, “विठूराया ... मला योग्य वाटलं तेच मी केलं रे... तुला योग्य वाटेल ती शिक्षा मला दे... विठ्ठला...”
एके दिवशी एक महाराचं पोरगं किल्ल्याच्या वेशीपाशी येऊन थांबलं. लहानखुरं आणि खपाटीला गेलेलं
पोट !
‘मला सुलतानांना भेटायचं आहे’ त्याने चौकीदाराला सांगितलं.
‘कोण रे तू ?’ चौकीदारने दूर लोटत त्याला विचारलं.
“मी श्रीहरी ! दामाजींचा निरोप घेऊन आलोय. मी त्यांच्याकडेच चाकरीला असतो. मला सुलतानांना निरोप पोहचवायचाय.” पोरानं उत्तर दिलं.
“बादशाह, दामाजीपंत म्हणजे विश्वासू चाकर ! मी त्यांना नेहमी तुमच्याशी, राज्याशी इमान राखतानाच पाहिलं आहे. त्यांना कसली शिक्षा देता आहात ? त्यांनी तर तुमचा फायदाच पाहिला.” सुलतानासमोर उभा असलेला श्रीहरी धिटाईने बोलला.
“इमान ? कैसे ?” सुलतानाचा प्रश्न.
“हे काय, धान्य वाटलं त्याच्याबदल्यात मिळालेल्या मुद्रा.” श्रीहरीने सोबत आणलेला वस्त्रकोश हुमायूँसमोर रिता केला.
दामाजीला पुन्हा दरबारात आणलं गेलं. मुद्रा पाहून खुश झालेल्या सुलतानाने त्याला शिक्षेतून मुक्त झाल्याचं सांगितलं आणि केलेल्या कामासाठी तो त्याला शाबाशी देऊ लागला.
दामाजी गोंधळला, “श्रीहरी? मी तर कोणा श्रीहरिला ओळखत नाही सुलतान.”
“छोटा बच्चा श्रीहरी ! तुझ्याकडेच चाकरी करतो तो. उसने ऐसे कहाँ |” आता सुलतान देखील संभ्रमात होता.
क्षणभरचं... दामाजीला उलगडा झाला, “श्रीहरी... विठ्ठल ... सुलतान, साक्षात विठ्ठल आपल्या भेटीला आला होता. माऊलीने मला सोडवलं... विठुराया...” त्याने डोळे मिटून हात जोडले.
दामाजीची पुण्याई अशी की आजही किल्ल्याच्या वेशीवर श्रीहरीची पावलं आहेत. एका वेशीत एक पाऊल तर दुसऱ्या वेशीत दुसरं....
सुरकुतलेला, थरथरता हात पावलावर फुलं वाहतो. उदबत्तीचा दरवळ पसरतो. पावलांमागची कहाणी संपलेली असते. ‘इथे डोकं टेका रे पोरांनो. ही जागा साक्षात पंढरी आहे. एक इथं आणि एक त्या तिकडं पलीकडल्या वेशीत,’ सांगता सांगता आजीचा हात पाठीवरून फिरतो आणि जाणवतं ‘विठू माऊली खरंच इथेच आहे.’

भूपाली निसळ.


Thursday, 12 March 2020

लिहिलेल्या विटांचे घर


इसविसनपूर्व सातव्या शतकाचा काळ. सर्गोनीद राजवंशाचा शेवटचा राजा असुरबनपालाने त्याचे असिरीयन साम्राज्य जगातील सर्वात मोठे राज्य म्हणून राखलेले. त्याचं सार्वभौमत्व देहबोलीतून दिसतं राहणारं. त्याच्या बलदंड शरीरावरच्या युद्धाच्या खुणा तो सिंहासारखा मिरवी. असुरबनपाल, एक अत्यंत पराक्रमी योद्धा आणि साहित्याची जाण असलेला रसिक वाचक !
असुरबनपालाने राजसभेत प्रवेश केला. सभा झुकली. त्याने मानेनेच वंदन स्वीकारलं आणि तो सिंहासनारूढ झाला. “अधिपती, इष्टका आल्या?”
अधिपतींनी सामोरं येत राजाला अभिवादन केलं, “श्रेष्ठ, गतदिनी काही ग्रंथ प्राप्त झाले. ते जमेत धरल्यास प्रार्थना, काव्ये, धार्मिक ग्रंथ, पौराणिक कथा, ज्योतिष आणि गणित असे विषय मिळून आपल्याकडे हजारात इष्टका जमल्या आहेत.”
राजाच्या चेहऱ्यावर समाधान विलसले, “तुम्ही ‘लिहिलेल्या इष्टकांचे अधिपती’, त्यांचे रक्षक ! अधिकाधिक विषयांवरचे इष्टकाग्रंथ आपल्या ग्रंथालयात जमा व्हावयास हवे. जनतेसाठी ते वाचनास उपलब्ध असावेत याची काळजी असू द्या.”
उत्तमोत्तम ग्रंथांनी राजाचे ‘इष्टकागृह’ सजू लागले. वालुकाकणांनी प्रत्येक ग्रंथाकरिता कपाटिका घडू लागल्या. विषयानुसार सूची झाल्या. ग्रंथ विभागाने रचले जाऊ लागले.
लौकरच त्यात इसविसनपूर्व सतराशे वर्षापूर्वीच्या शुक्र ताऱ्याच्या वेधाची शादा (वीट) मानाने विराजमान झाली.
एके सायंकाळी इष्टका घेऊन राजा शुक्राच्या दर्शनास इन्द्रकोशात उभा होता. उजळता शुक्र पश्चिमेच्या क्षितिजावर लकाकू लागला. समोर नजरेस पडत होते ‘ग्रंथालय’, मुकुटात चांदणं गुंफल्यागत !
“नरेंद्र...” सेवक आला. राजाने आकाशावरची नजर न हटवता हातानेच पुढे बोलण्याची आज्ञा केली.
“नरेंद्र, हम्मुराबी आपले दर्शन घेऊ इच्छितात.”
“नरेश हम्मुराबी ? त्यांना मानाने येथे घेऊन या.”
हम्मुराबीच्या हातात इष्टका पाहून, असुरबनपालाचे कुतूहल जागे झाले. हम्मुराबीने लिहिलेले कायदे, जगातील पहिली कायद्याची लिखित संहिता आता असिरीयन साम्राज्याच्या ग्रंथालयाचा भाग झाली होती.
      काळ लोटला. पडझडी झाल्या. सामाज्य्रे जमीनदोस्त झाली. धुळीच्या लोटांनी ‘लिहिलेल्या विटांचं घर’ पोटात घेतलं. शेकडो वर्षांनी हे लोट जेव्हा बाजूला सरले तेव्हा दिसल्या हजारो विटा... त्यावरची लिपी छातीशी घट्ट जपलेल्या !

भूपाली निसळ.

Tuesday, 10 December 2019

काळी पडझड


     

         
           वेत्रवती आकाशाने देऊ केलेली जांभळी वस्त्र लेऊन वेल्हाळ वाहत होती. काठच्या झाडांनी गोळा केलेला अंधार नदीपात्राकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर सांडला. संध्येच्या प्रहराला पावसाळी झाकोळ तीक्ष्ण बनून पाण्याकडे सरकला. थेंबांच्या चाहुलीने, हिरव्या सळसळीच्या उंच टोकांवर मोरपंखी पिसा-यात लगबग झाली न् नदीमध्ये तरंग उठले.
पल्याडच्या काठाने लाल पत्थरांची वास्तू आकार घेत होती. दिवसागणिक तिचं थरथरतं प्रतिबिंब नदीतून मोठं होऊ लागलं.
राजाने आंदोळत्या बिंबावरून नजर फिरवली. उभ्या उंच गेलेल्या भिंतींनी त्याच्या स्वप्नांना ग्वाही दिली.
'आता कळस', राजा समाधानाने म्हणाला. 
त्याने सूचना दिल्या. शेकडो हात झटू लागले. लाल अखंड पाषाण, साच्यात कापला जात होता. मोठ मोठे तुकडे हत्तींनी वाहून नेले. मंदिराच्या दोन्ही दिशांनी, कितीतरी अंतरावरून शिळा रचायला सुरुवात झाली. जमिनीलगतचा एक थर पूर्ण झाला. त्यावर आता दुसरा थर ... कारागिरांनी चौकोनी दगड रचत आणले. भिंतींच्या वरच्या टोकापासून भूमीलगत, लांबपर्यंत उतार घडू लागला.   
एक, दोन... पाच.. दहा सारंग एका वेळेस शिखराच्या दिशेने चढत होते. चढाव फत्ते झाले. त्यांवरून आता कळसाचे अवयव वर न्यायचे, ते जोडायचे. एकमेवाव्दितीय भव्य देवालय, भव्य शिवलिंग राजा समाधानाने पाहत राहिला.
आयतनाच्या मागच्या बाजूने नदीमध्ये बांध पसरलेला. त्याने नदीचं पाणी अडवून प्रजेसाठी तलाव केला होता. तलावाचं नितळ, गोड पाणी दुभत्या जनावरांपासून माणसा – कणसांपर्यंत सगळ्यांची तहान भागवायचं.  
होशंगशहाचं शत्रुसैन्य रात्रीतून मंदिरापर्यंत पोहोचलं. गोल बंदिस्त पाण्याभोवती वेढा घातला गेला.
"फौजेवर हल्ला करायचा नाही." त्याने पुन्हा एकदा फर्मान सोडलं. हालचालींना वेग आला. चढावाचे पत्थर एक एक करून हटू लागले. मंदिराच्या छताचा जमिनीशी संपर्क तुटला.
मागच्या बाजूने बांधाला जागोजागी भगदाडं पडली. तलाव बेफाम होऊन घरादारांतून शिरू लागला.
राजा हरला... सैन्य हरलं, प्रजा हरली ... रक्ताचा एक थेंबही न सांडता होशंगशहाने लढाई जिंकली.
आजही या मंदिराला कळस नाही. मात्र आजूबाजूला दिसतं राहतात, शिखरासाठी बांधलेल्या चढावाच्या खुणा आणि कोरडया ठक्क तलावातली काळी पडझड.

भूपाली निसळ.

Friday, 31 May 2019

संयोगभूमी





मलायीची युद्धभूमी दुमदुमू लागली. तीनही बाजूंनी सागराच्या उसळत्या स्फटिकांनी कवेत घेतलेला हिरवाकंच बहरप्रदेश रक्तामासांच्या पाटांनी वाहू लागला. कलशपूला मलायीची भूमी कोणत्याही परिस्थितीत हवीच होती.
रामाधीपती, स्थिर विचारी राजा. त्याने मलायीला शांत, संयत पोसलं होतं. मलायी म्हणजे उसळत्या समुद्रातली संयोगभूमी. तुल्यबळ सैन्य पोसणाऱ्या रामाधीपतीला संहार मान्य नव्हताचं कधी. गौतमाच्या वाटेवरून जाताना त्याने माणूस जपला होता. मलायी म्हणजे तीन प्रमुख पंथांचा मिलाफ. सर्वार्थाने संयोगभूमी ! रामाधीपतीने उभारलेले जागोजागचे गौतमाचे पुतळे, शिवाची मंदिरे आणि विष्णूची शिल्पं मलायीचं सौंदर्य राखून होती.
बुधगुप्ताने आपली नाव किनाऱ्यावरून उसळत्या लाटांतून आत घेतली. दरिया पार करून पल्याडच्या बेटाकडे तो झपाझप वल्हू लागला. उसळतं पाणी नावेतून तोल खेचू लागलं, छातीत वेड भरलेला वारा त्याच्या नावेला उखडू पाहणारा. बुधगुप्ताने बेटं गाठलं. किनाऱ्याशी नाव बांधून त्याने वाळूतून आपले पाय रुतवले आणि तो चौफेर पाहू लागला. सारा दिवस बेटांतून चालत, त्याने रक्ताचा लाल रंग अन् माणसाची कातडी न कळलेल्या त्या प्रदेशाची खात्री करून घेतली आणि लगबगीने तो नावेकडे परतला.
उन्हं कलू लागली तसं अंधारल्या आकाशाने भणाणा वारा ओतायला सुरुवात केली. परतीला बुधगुप्ताचा कस लागत होता. समोर मलायीचा प्रदेश दिसू लागला. संध्याकाळच्या दाट काळ्या प्रकाशात, मलायीची हिरवी सळसळ सावळी होऊन हलत होती. काठावर दिसतं होती गौतमाची भूस्पर्श मुद्रेतली मूर्ती. पलित्यांच्या ज्वालांनी मूर्तीच्या रेषांना सोनेरी किनार देऊ केलेली. मोत्याच्या लाटा मूर्तीच्या हाताला स्पर्शून परत फिरत होत्या.
बुधगुप्त किनाऱ्याशी आला. अंधाराने संहाराला स्वल्पविराम दिला. बुधगुप्त मलायीत शिरला. रात्रीच्या अंधारात त्याने एक एक तेज:मुर्ती किनाऱ्याकडे हलवायला सुरुवात केली. गौतम, शिव, नारायणाच्या मूर्ती त्याच्या नावेतून आता हेलकावत प्रवासाला निघाल्या.
  नंतरच्या कित्येक रात्रीतून बलदंड हात सागरातून लाटा मागे करत, पाषाणतत्वांना नवीन भूमी बहाल करीत राहिले. कोणत्याही विकारांचा स्पर्शही न झालेली ती रुपेरी वाळू आता मलायीतल्या सौंदर्याने रसरसून उठली होती. अखंड सौंदर्य !
कलशपूचा पाडाव एकटया बुधगुप्ताने केला. आणि त्याने जिंकून घेतली आकारांची आणि जाणिवांची अशी संयोगभूमी जिथे आता पाषाणांचे सोहळे उमलले आहेत.
भूपाली निसळ.

Wednesday, 10 April 2019

सौमिक ...




अश्वत्थाच्या पानांची सळसळ अंगांगी जाणवत होती. पानांमधून भिरभिरता हिरवा वारा त्याला लपेटून घेणारा. त्याच्या चित्राच्या चौकटीवर हलत्या पानांचा ऊन सावलीचा लपंडाव हळवा होऊन उतरत होता. श्रीहरीच्या मुकुटातल्या मोरपिसागत आज त्याचा कुंचला हळुवार झाला.
आज कृष्णलीला उतरत नव्हतीच रंगांतून... प्रत्येक रंग वल्लरीचा होता. तिच्या हसूचा, तिच्या पापण्यांचा, तिच्या मोहाचा, तिच्या सायीच्या हातांचा रंग. त्याने उसासा टाकत वर सळसळत्या अश्वत्थाकडे पाहिलं. पानांच्या हालचालीने त्याचा हात जागीच थरथरला.
पाठमोऱ्या कृष्णाला चेहरा नव्हता. कसलेल्या शरीराचा भाग असलेली त्याची पाठ त्याने त्याच्या पिळदार हातांच्या मागच्या घडीने अर्धवट झाकून टाकली होती. त्याचे मानेवर रुळणारे केस कालिंदीवरून येणाऱ्या निळ्या वाऱ्याने हळुवार उडत होते. आजचा कृष्ण स्वस्थ नव्हता, आजचा कृष्ण स्थिर नव्हता. चित्रातून वाहणारी कालिंदी आज कृष्णाहून जास्त जिवंत वाटत होती. खळाळत जात तिने डोंगरापलीकडला रस्ता धरलेला. तिथून वळून अदृश्य झालेली कालिंदी, आज डोंगरामागूनही जाणवत होती. नितळ प्रवाहाच्या हातात हात घालून येणारी पायवाट माधव न्याहाळत असावा.
आठवांना वळसा घालून कुंचल्यातून रंग आस्ते आस्ते येत होते. ‘आत्ताच तर भेटून आलो आहे मी माझ्या वल्लरीला. तिचे खांद्यावरून छातीवर रुळलेले केस आत्ताच तर स्पर्शून आलो आहे. तिच्या कांतीच्या छटा पुरत्या विरघळल्या देखील नाहीयेत अजून माझ्यात, मग मला का आठवतीये ती इतक्या आवेगाने पुन्हा पुन्हा ?’
त्याने कुंचल्याचा रंग बदलला. गडद आकाश किनाऱ्याला झाकोळू लागलं. श्रीकृष्णाची छबी अजुनाजून उत्कट भासू लागली.
अश्वत्थाच्या सावलीने त्याला गहन व्याकुळ केलं. सावली पलीकडच्या उजेडाच्या ज्वाळेत स्वतःलाच उभं करून प्रायश्चित्त घ्यावं असं त्याला सतत वाटू लागलं. चित्रातून डोकावणाऱ्या वल्लरीला तो बाजूला सारू शकत नव्हता. तिच्या वस्त्रांचे किरमिजी तरंग, कुंचल्यातून त्याला वेढत राहिले.
श्रीहरी कोणाची वाट पाहतो आहे ? कालिंदीचा खळाळ त्याच्या पावलांना अस्थिर करतो आहे. पलीकडल्या रानातून हिरव्या गालिच्यावर दुडदुडणाऱ्या पाडसाने कृष्णाच्या पाठमोऱ्या आकृतीला अस्फुटसा नाद दिला आहे.
चाहुलीचे पडघम आत वाजत आहेत कि चित्रात ? तो चौफेर नजर फिरवतो. रंगातून विलग केलेला कुंचला रंगांवरून फिरवत तो नेमकी छटा शोधतो आहे.
बहुदा आज संयमाचा रंग सापडणे कठीण आहे.
भूपाली निसळ.