मलायीची युद्धभूमी दुमदुमू
लागली. तीनही बाजूंनी सागराच्या उसळत्या स्फटिकांनी कवेत घेतलेला हिरवाकंच
बहरप्रदेश रक्तामासांच्या पाटांनी वाहू लागला. कलशपूला मलायीची भूमी कोणत्याही
परिस्थितीत हवीच होती.
रामाधीपती, स्थिर विचारी
राजा. त्याने मलायीला शांत, संयत पोसलं होतं. मलायी म्हणजे उसळत्या समुद्रातली
संयोगभूमी. तुल्यबळ सैन्य पोसणाऱ्या रामाधीपतीला संहार मान्य नव्हताचं कधी.
गौतमाच्या वाटेवरून जाताना त्याने माणूस जपला होता. मलायी म्हणजे तीन प्रमुख
पंथांचा मिलाफ. सर्वार्थाने संयोगभूमी ! रामाधीपतीने उभारलेले जागोजागचे
गौतमाचे पुतळे, शिवाची मंदिरे आणि विष्णूची शिल्पं मलायीचं सौंदर्य राखून होती.
बुधगुप्ताने आपली नाव
किनाऱ्यावरून उसळत्या लाटांतून आत घेतली. दरिया पार करून पल्याडच्या बेटाकडे तो
झपाझप वल्हू लागला. उसळतं पाणी नावेतून तोल खेचू लागलं, छातीत वेड भरलेला वारा
त्याच्या नावेला उखडू पाहणारा. बुधगुप्ताने बेटं गाठलं. किनाऱ्याशी नाव बांधून
त्याने वाळूतून आपले पाय रुतवले आणि तो चौफेर पाहू लागला. सारा दिवस बेटांतून चालत,
त्याने रक्ताचा लाल रंग अन् माणसाची कातडी न कळलेल्या त्या प्रदेशाची खात्री करून
घेतली आणि लगबगीने तो नावेकडे परतला.
उन्हं कलू लागली तसं
अंधारल्या आकाशाने भणाणा वारा ओतायला सुरुवात केली. परतीला बुधगुप्ताचा कस लागत
होता. समोर मलायीचा प्रदेश दिसू लागला. संध्याकाळच्या दाट काळ्या प्रकाशात,
मलायीची हिरवी सळसळ सावळी होऊन हलत होती. काठावर दिसतं होती गौतमाची भूस्पर्श
मुद्रेतली मूर्ती. पलित्यांच्या ज्वालांनी मूर्तीच्या रेषांना सोनेरी किनार देऊ
केलेली. मोत्याच्या लाटा मूर्तीच्या हाताला स्पर्शून परत फिरत होत्या.
बुधगुप्त किनाऱ्याशी
आला. अंधाराने संहाराला स्वल्पविराम दिला. बुधगुप्त मलायीत शिरला. रात्रीच्या
अंधारात त्याने एक एक तेज:मुर्ती किनाऱ्याकडे हलवायला सुरुवात केली. गौतम, शिव, नारायणाच्या
मूर्ती त्याच्या नावेतून आता हेलकावत प्रवासाला निघाल्या.
नंतरच्या
कित्येक रात्रीतून बलदंड हात सागरातून लाटा मागे करत, पाषाणतत्वांना नवीन भूमी बहाल
करीत राहिले. कोणत्याही विकारांचा स्पर्शही न झालेली ती रुपेरी वाळू आता
मलायीतल्या सौंदर्याने रसरसून उठली होती. अखंड सौंदर्य !
कलशपूचा पाडाव एकटया
बुधगुप्ताने केला. आणि त्याने जिंकून घेतली आकारांची आणि जाणिवांची अशी संयोगभूमी
जिथे आता पाषाणांचे सोहळे उमलले आहेत.
भूपाली निसळ.

No comments:
Post a Comment