Tuesday, 1 January 2019

रामदास गुरु माझें आई ...



सातारा सोडून आमची फियाट गाडी, उजवीकडे सज्जनगडाकडे वळायची. वळणाआधीचा बोगदा गाव मागे पडत असल्याचं सांगायचा. एकदा का गाडी वळली की मी, सोबत आणलेल्या तीन उश्या सिटवर ठेऊन, त्यावर बसायचे. खिडकीपर्यंत नीट पोहोचता यावं आणि खिडकीबाहेर डोकावता यावं, यासाठी ही सगळी तयारी असे. मग भन्नाट वारा झेलता यायचा. हिरवे डोंगर नजरेत यायचे. गाडी काही वेळाने घाट चढू लागायची नि मी स्तिमित होऊन बाहेर पहात राहायचे. सज्जनगडाच्या निम्म्या डोंगरावर असणाऱ्या वाहनतळावर तेव्हा फक्त आपलीच गाडी पाहून भारी वाटायचं. ही सज्जनगडाच्या आठवणीतली पहिली आठवण !
काय आकर्षण होतं त्या जागेत, जे आजही तितकंच टिकून आहे, हे मात्र कळत नाही. बाबांनी पहिला ओमकार गडाच्या गाभाऱ्यात शिकवला. ओमकारापलीकडची चौथी तुर्यावस्था ... तिचा पहिला अनुभव सज्जनगडावरचाच. अनामिक ओढ .. भारावलेपण, माया, भक्ती, चैतन्य हे सारं एकाचवेळी एकाच ठिकाणी अनुभवणं हे नेहमीच शब्दातीत वाटत आलं आहे.
पुढे गाडीचं स्टीअरिंग माझ्या हातात आलं आणि मी मनात येईल तेव्हा, सज्जनगड आणि शिवथरघळीच्या (शिवतर) वाऱ्या करू लागले. गाभाऱ्यातून रामदासांच्या समाधीपर्यंतचा प्रवास अनेक मानसिक आंदोलनांचा होता. खूप मोठी जबाबदारी अंगावर येऊन पडली होती आणि मी नवख्या जगात एकटयाने लढायला बळ एकवटत होते.
समाधीसमोर गेले कि उमाळे यायचे आतून आणि मी हमसून हमसून रडायचे. समाधीचा स्पर्श मला अतोनात बळ देऊन गेला. तो स्पर्श माझ्या बोटांच्या टोकांवर घट्ट पेरून ठेवलाय मी. रामदासांना हनुमंताने दिलेली वल्कल हातात घेताना... अंगातून वीज वाहावी इतकं तेज जाणवत होतं. हे माझ्या आयुष्यभरासाठीचे अनुभव आहेत.
वरंधघाट ... आता सिटवर बसायला उशीची गरज नसते. मला खिडकी आणि समोरची अख्खी काच मिळालेली असते. घाटरस्ता उंचच उंच चढत राहतो, उंचच उंच नेत राहतो. भक्कम वळणांच्या घाटाला आता भिंती उभ्या केल्या आहेत. माझ्या आठवणीतला वरंध म्हणजे ... रस्ता आणि दोन्ही बाजूंना खोल दरी !
घाटमाथ्यावर गाडी बाजूला घ्यायची आणि फक्कड चहा सांगून समोरच्या दरीकडे जायचं. निसर्गाचं ते रूप पाहून आपण बिंदूसमान असल्याची जाणीव तिथूनच रुजायला लागते. ‘ तू कोण? ’ असे प्रश्न मनाशी सुरु होतात. समोर पसरलेल्या दरीतून अनेक पायवाटा आपल्याला शिवथरघळीपर्यंत नेणाऱ्या आहेत हे माहित असतं. खालचं निबिड जंगल पाहून, माहितगार वाटाडयाशिवाय असं जाणं शक्य नाही हे लक्षात येतं आणि आपण निमूट गाडीत येऊन बसतो. (इथेच ही अवस्था तर, हेळवाक घळीच काय बोलावं. कोयनामाई धावते शेजारून. भोवताली मोठमोठे कडे, दाट जंगल आणि वाघ,अस्वल,लांडग्यांचा वावर... कसे पोहोचले असतील रामदास स्वामी तिथे? कसें राहिले असतील?) 
पुढे घाटातच शिवथरघळीकडे जाणारा एक रस्ता दिसतो. पण तो फार पायाखालचा नाही. घाट संपतो तेव्हा निसर्गाने आपल्याला पुरतं जमिनीवर आणलेलं असतं. थोडं पुढे गेल्यावर, उजवीकडून रुळलेली वाट आपल्याला शिवथरघळीकडे घेऊन चलते. इथून जगाशी संपर्क तुटावा असे आपण पुढे जात राहतो. उंच डोंगर हिरवेपण ल्यालेले असतात. हिरवी झाडं, धुक्यातून डोकावत असतात. साऱ्या आसमंतात भरीव गाज असते .. “ ओम ” !!!
अमानिक ओढीने आपण शिवथरघळ येण्याची वाट पाहत, पुढे पुढे जात राहतो. आता ऐकू येऊ लागतो प्रपात ... जलप्रपात .. उभ्या सह्याद्रीच्या उंच कातळातून ओसंडून वाहणारा प्रपात .. शिवथर .. शिवथरनदी स्वतःला खाली झेपावून वाहत राहते ओथंबून. प्रवाहाकडे पाहिलं कि वाटतं, या पाण्याने पाहिलंय रामदासांना ! हा प्रपात नतमस्तक तर होत नाहीयेना, रामदासांच्या पायाशी ! चहूबाजूंनी नजर फिरू लागते आणि सगळ्या बाजूंनी व्यापून असतात सह्याद्रीचे कडे, घनदाट झाडी.. आज इतकी घनदाट झाडी, तेव्हा काय असेल.. सारं अगम्य !
पायऱ्या चढून, आपण घळीकडे जात राहतो आणि सर्वांग थरथरत असतं. डोळे भरून येतात ..अवघ भारावलेपण जगत आपण लीन होतो, नतमस्तक होतो. आता ओसंडून वाहणारा प्रवाह जवळ येऊ लागतो. त्याचा प्रचंड रोरावता आवाज साऱ्या देहाभोवती लपेटून राहतो. वाऱ्याने उडणारे तुषार, घळीत प्रवेश करण्याआधी जणू काही मनावरचं मळभ धुवून टाकतात आणि आपण घळीत प्रवेशते होतो. वरून कोसळणारं...शेजारून वाहणारं पाणी, झाडांची सळसळ निसर्गाची लय सांगत असतात आणि समोर असतात ... समर्थ रामदासस्वामी !
सारी घळ कवेत घ्यावी आणि रामदासआईने कुठूनतरी समोर यावं या जाणीवा प्रखर.. अजून प्रखर होत जातात.
दासबोध... आत्माराम ... मनाचे श्लोक किती सुंदर नावं.. ते त्यांना झालेला बोध आपल्याला सांगतात, ते मनातून उमलून येणारे शब्द, श्लोक आपल्याला सांगतात. आपल्या आतच असलेली उत्तरं शोधायची आणि त्यासाठी मार्ग शोधायला गुरूची मदत घ्यायची.
रामरूपी अंतरात्मा म्हणताना ते राम ही प्रवृत्ती सांगतात. अवकाशाचं ज्ञान देतात. हे सगळचं फार मोहून टाकणारं आहे आणि ताकद देणारं देखील.
रात्री तिथल्या आभाळतुकडयात दिसणाऱ्या अनंत चांदण्या ... गार वारा आणि समोर असते शिवथरघळ ...
प्रपाताच्या गजरात .. शांत, मंद ज्योतीसारखी !

भूपाली निसळ.

32 comments:

  1. Thanks a lot swarupa. Keep on reading my blog.

    ReplyDelete
  2. Thanks a lot swarupa. Keep on reading my blog.

    ReplyDelete
  3. Nice read... waiting for Ur next blog

    ReplyDelete
    Replies
    1. thanks a lot .. yah do keep on reading. plz follow the blog

      Delete
  4. As usual a good read 😊👍

    ReplyDelete
  5. व्वा भूपाली, ही खळाळती लेखनी अखंड वाहू दे!

    ReplyDelete
    Replies
    1. thanks a lot kaka .. for your good wishes ( always) ...

      Delete
  6. खूपच सुंदर लिहिलं आहेस भूपाली !!
    आणि खरंच निसर्गासमोर आपण बिंदूसमान आहोत 🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी .. आणि हि जाणीव आपल्याला जमिनीवर पाय ठेवायला मदत करते..

      Delete
  7. Khup mast Bhoopali...
    Thanks for the lovely ride in ur fiat.
    Aani...chaaan darshan...Ramdas Swaminche����

    ReplyDelete
  8. Replies
    1. thanks a lot :)
      do keep on reading , plz follow the blog

      Delete
  9. कुठे नेऊन ठेवलाय लिखाणाचा दर्जा !
    अप्रतिम वर्णनावरून ! प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव आला.
    विशेषतः हाही ओळ फारच स्पर्शून गेली,'तो स्पर्श माझ्या बोटांच्या टोकांवर घट्ट पेरून ठेवलाय मी.'
    👌

    ReplyDelete
    Replies
    1. thanks a lot kaka.. thanks for your wonderful comment .. मनातलं मनापासून कागदावर उतरवताना, मिळणारी शाबासकी , प्रोत्साहन असतं.. do keep on reading _/\_

      Delete
  10. 1978 साली सज्जनगडावर गेलो होतो, शाळेच्या ट्रिपला, आता विस्मृतीत गेला आहे,तू पुन्हा समोर उभा केलास,भावनात्मक व वर्णनात्मक ! छानच !
    लिहत रहा ! वाचू आम्ही !

    ReplyDelete
    Replies
    1. काळानुरूप गडावर बांधकाम आणि गर्दी हा भाग सोडला तर , समाधी तशीच आहे , शांतावणारी ..

      Delete
  11. Khup chhan.Vachtana mja ali. Apratim lekhan. Kp blogging, i'll follow the blog👍

    ReplyDelete
    Replies
    1. thank u ... thanks a lot :) ... i hope u ll like the next one too

      Delete
  12. सर्व लेख खूपच छान. लिहित राहा.

    ReplyDelete