Wednesday, 10 April 2019

सौमिक ...




अश्वत्थाच्या पानांची सळसळ अंगांगी जाणवत होती. पानांमधून भिरभिरता हिरवा वारा त्याला लपेटून घेणारा. त्याच्या चित्राच्या चौकटीवर हलत्या पानांचा ऊन सावलीचा लपंडाव हळवा होऊन उतरत होता. श्रीहरीच्या मुकुटातल्या मोरपिसागत आज त्याचा कुंचला हळुवार झाला.
आज कृष्णलीला उतरत नव्हतीच रंगांतून... प्रत्येक रंग वल्लरीचा होता. तिच्या हसूचा, तिच्या पापण्यांचा, तिच्या मोहाचा, तिच्या सायीच्या हातांचा रंग. त्याने उसासा टाकत वर सळसळत्या अश्वत्थाकडे पाहिलं. पानांच्या हालचालीने त्याचा हात जागीच थरथरला.
पाठमोऱ्या कृष्णाला चेहरा नव्हता. कसलेल्या शरीराचा भाग असलेली त्याची पाठ त्याने त्याच्या पिळदार हातांच्या मागच्या घडीने अर्धवट झाकून टाकली होती. त्याचे मानेवर रुळणारे केस कालिंदीवरून येणाऱ्या निळ्या वाऱ्याने हळुवार उडत होते. आजचा कृष्ण स्वस्थ नव्हता, आजचा कृष्ण स्थिर नव्हता. चित्रातून वाहणारी कालिंदी आज कृष्णाहून जास्त जिवंत वाटत होती. खळाळत जात तिने डोंगरापलीकडला रस्ता धरलेला. तिथून वळून अदृश्य झालेली कालिंदी, आज डोंगरामागूनही जाणवत होती. नितळ प्रवाहाच्या हातात हात घालून येणारी पायवाट माधव न्याहाळत असावा.
आठवांना वळसा घालून कुंचल्यातून रंग आस्ते आस्ते येत होते. ‘आत्ताच तर भेटून आलो आहे मी माझ्या वल्लरीला. तिचे खांद्यावरून छातीवर रुळलेले केस आत्ताच तर स्पर्शून आलो आहे. तिच्या कांतीच्या छटा पुरत्या विरघळल्या देखील नाहीयेत अजून माझ्यात, मग मला का आठवतीये ती इतक्या आवेगाने पुन्हा पुन्हा ?’
त्याने कुंचल्याचा रंग बदलला. गडद आकाश किनाऱ्याला झाकोळू लागलं. श्रीकृष्णाची छबी अजुनाजून उत्कट भासू लागली.
अश्वत्थाच्या सावलीने त्याला गहन व्याकुळ केलं. सावली पलीकडच्या उजेडाच्या ज्वाळेत स्वतःलाच उभं करून प्रायश्चित्त घ्यावं असं त्याला सतत वाटू लागलं. चित्रातून डोकावणाऱ्या वल्लरीला तो बाजूला सारू शकत नव्हता. तिच्या वस्त्रांचे किरमिजी तरंग, कुंचल्यातून त्याला वेढत राहिले.
श्रीहरी कोणाची वाट पाहतो आहे ? कालिंदीचा खळाळ त्याच्या पावलांना अस्थिर करतो आहे. पलीकडल्या रानातून हिरव्या गालिच्यावर दुडदुडणाऱ्या पाडसाने कृष्णाच्या पाठमोऱ्या आकृतीला अस्फुटसा नाद दिला आहे.
चाहुलीचे पडघम आत वाजत आहेत कि चित्रात ? तो चौफेर नजर फिरवतो. रंगातून विलग केलेला कुंचला रंगांवरून फिरवत तो नेमकी छटा शोधतो आहे.
बहुदा आज संयमाचा रंग सापडणे कठीण आहे.
भूपाली निसळ.

2 comments: